Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पर्रिकर यांचा शपथविधी
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: na1
गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश; सुप्रीम कोर्टाची काँग्रेसला चपराक
5नवी दिल्ली/पणजी, दि. 14 (वृत्तसंस्था) : गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांच्यासमवेत त्यांच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांनाही शपथ दिली. तत्पूर्वी, भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी फेटाळताना पर्रिकर यांना गुरुवारी (दि. 16) रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या दोन, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आणि दोन अपक्ष आमदारांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, पर्रिकर हे बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरतील, असा दावा काँग्रेसने केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी काँग्रेसची याचिका फेटाळल्यानंतर मनोहर पर्रिकर यांचा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. राज्यपालांनी नियोजित केल्यानुसार सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. केंद्रातील संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्यात परतलेल्या पर्रिकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सर्वप्रथम शपथ दिली. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. पर्रिकर यांनी कोकणी भाषेतून शपथ घेतली तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर यांनी मराठीतून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर भाजपचे पांडुरंग मडकईकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मनोहर आजगावकर, गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर आणि अपक्ष गोविंद गावडे व रोहन खवटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले प्रभाकर तिंबले, सरचिटणीस मोहनदास लोलयेकर आणि प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना राजभवनाबाहेर भाजपच्या नवनिर्वाचित सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली.
पर्रिकर यांचे काँग्रेसवर टीकास्त्र
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पर्रिकर यांनी गोव्यातील मतदारांनी कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नसल्याचे मान्य करतानाच काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. गोव्यात कोणालाच स्पष्ट जनादेश नसला तरी कोणताही आमदार काँग्रेसला पाठिंबा द्यायला तयार नव्हता. मात्र, आमच्याकडे 22 आमदारांचा असलेला पाठिंबा पुरेसा आहे. काँग्रेसकडे बहुमत होते तर ते त्यांनी राज्यपालांच्या समोर सिद्ध का केले नाही, असा सवाल त्यांनी केला. आमची आघाडी निवडणुकीनंतर झाली असून फक्त गोव्याचा विकास याच उद्देशाने भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबतच्या प्रश्‍नावर पर्रिकर म्हणाले, आम्ही सर्वप्रथम विधानसभेत बहुमत सिद्ध करू. त्यानंतर उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. बहुमत सिद्ध केल्यानंतर खातेवाटप करू. आधी एकत्र येणे हाच आमचा किमान समान कार्यक्रम होता. काँग्रेसने 10 वर्षांमध्ये 12 मुख्यमंत्री दिले. त्यांच्यात अंतर्गत वाद असल्याने कोणीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही. त्यांनी आज पुन्हा त्याचा प्रत्यय दिला. तुम्ही बहुमत सिद्ध केले का, हा प्रश्‍न मी आज पुन्हा त्यांना विचारू इच्छितो. आमच्याकडे पहिल्या दिवसापासून 21 आमदारांचा पाठिंबा होता. काँग्रेसचे आमदार बसमधून राज्यपालांची भेट घेण्यास गेले होते. त्यांना कारमधून जाण्याची भीती वाटत असावी. काँग्रेसचे आमदार कारमधून गेले असते तर राज्यपालांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत काही कार गायब झाल्या असत्या, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच ते 17 आमदारांना एका बसमधून घेऊन गेले, अशी टीका पर्रिकर यांनी काँग्रेसवर केली.
आम्ही बहुमताचा आकडा कसा गाठला, हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. सरकारला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक आमदाराने पर्रिकर यांना दिल्लीतून गोव्यात पाठवण्याची एकमेव अटी घातली होती. सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई यांनीही मला पाठिंबा दिला. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास पर्रिकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मनोहर पर्रिकर यांचे अभिनंदन केले.
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला फटकारले
तत्पूर्वी, भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निर्णयाला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज सकाळी फेटाळली. तुमच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते, त्यामुळेच तुम्ही राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला नाही. संख्याबळ तुम्हाला अनुकूल आहे, हे तुम्ही राज्यपालांसमोर सिद्ध केले नाही, अशा शब्दात न्यायालयाने काँग्रेसला फटकारले. काँग्रेसचे गटनेते विजय कवळेकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळतानाच विधानसभेत 16 मार्च रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेशही न्यायालयाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिले. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर सभागृहात गुरुवारी फक्त बहुमत
चाचणी होईल. त्या दिवशी अन्य कोणतेही कामकाज होणार नाही. बहुमत चाचणीसाठी निवडणूक आयोगाशी संबंधित असलेली आवश्यक
प्रक्रिया उद्या (बुधवार) पूर्ण करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. विधानसभेत संयुक्त बहुमत चाचणी घ्यावी, ही
काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेली मागणीही न्यायालयाने फेटाळली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: