Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘काशीनाथाचं चांगभलं...’ च्या गजरात फुलेनगरचे बगाड उत्साहात
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: re2
5वाई, दि. 14 : फुलेनगर येथील काळूबाई देवीची बगाड यात्रा ‘काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात मंगळवारी उत्साहात पार पडली. सायंकाळी 6.30 च्या सुमारास बगाड श्री काळेश्‍वरी देवीच्या मंदिरात पोहोचले.
सकाळी 7 च्या सुमारास बगाडाचा गाडा मोकळा वाकेश्‍वर येथे नेण्यात आला. बगाड्या विक्रम कोरडे यांना वाकेश्‍वर येथे विधिवत स्नान घालून देवीची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर कोरडे यांना रथाला टांगून बगाड ओढण्यास सकाळी 9 च्या सुमारास सुरुवात झाली. सुरुवातीसबैलांच्या तीन-चार जोड्या लावण्यात आल्या. तद्नंतर या परिसरातील शेतकर्‍यांनी आपापले बैल जोडून बगाड ओढण्याची परंपरा जपली. रस्त्याच्या अलीकडे बगाड आल्यानंतर एक बैल जोडी व दोरखंडाच्या सहाय्याने तरुण कार्यकर्त्यांनी बगाडाचा गाडा ओढला. बगाडा पाठोपाठ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चांदीच्या पालखीत काळूबाई देवी ठेवण्यात आली होती. दुपारी 1.30 च्या सुमारास बगाड भद्रेश्‍वर रस्त्यावर आले. यावेळी सनई-ताशांच्या निनादात भाविकांनी जल्लोष केला. भाविक बगाडास गोंडे व नारळाची तोरणे बांधून आपले नवस फेडताना दिसत होते.
याप्रसंगी तरुण व अबालवृद्ध ग्रामस्थांनी उत्साहाने एकमेकांच्या अंगावर रंग टाकून होळी व रंगपंचमीसाजरी केली. सायंकाळी 6.30 पर्यंत फुलेनगर येथील काळूबाई मंदिरापर्यंत बगाड आले होते. त्या ठिकाणी बगाडाची सांगता झाली. बगाडाच्या यशस्वितेसाठी फुलेनगर परिसरातील ग्रामस्थांनी विशेषत: तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. बगाड यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात व शांततेत पार पडली. यात्रेनिमित्ताने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सेवक तैनात करण्यात आले होते. बगाडाच्या पुढे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ठेवून भाविकांची पाण्याची सोय करण्यात आली होती. भद्रेश्‍वर रस्त्याच्या दोन्ही बाजूस व श्री काळेश्‍वरी मंदिराच्या परिसरात मिठाई, खेळणी व आईस्क्रीमची दुकाने लावण्यात आली होती.
श्री काळेश्‍वरी मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. यावेळी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर व देवीस फुलांनी सुशोभित करण्यात आले होते. भाविक रांगेने दर्शन घेताना दिसत होते. त्यात महिलांची संख्या अधिक होती.
बगाड पाहण्यासाठी वाई परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ व सहकार्‍यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: