Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्जमाफीवर शिवसेना, विरोधक ठाम
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:09 AM (IST)
Tags: mn2
विधिमंडळातील कोंडी फुटण्याचे चिन्ह दिसेना!
5मुंबई, दि.14(प्रतिनिधी) : शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकां बरोबरच सत्ताधारी युतीतील शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला असून विधिमंडळाच्या दुसर्‍या आठवड्याच्या कामकाजावरही गदारोळाचे सावट पडले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी भाजपचे वरिष्ठ मंत्री प्रयत्नशील असून उद्या सकाळी होणार्‍या बैठकीत मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ असून उद्या सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाईल, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना व विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात फारसे कामकाज होऊ शकले नाही. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्या (बुधवार) दुसर्‍या आठवड्याचे कामकाज सुरू होणार असून कामकाजाची कोंडी या आठवड्यात तरी फुटणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा आग्रह सोडू नका, असे स्पष्ट आदेश शिवसेना आमदारांना दिले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी राज्याचा 2017-18 चा अर्थसंकल्प सादर करणार असून अर्थसंकल्पीय भाषणात कर्जमाफीची घोषणा करावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. तीच मागणी विरोधकांनीही उचलून धरली आहे. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असून केंद्राच्या मदतीशिवाय कर्जमाफी शक्य नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीतही भाजपने सत्ता आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारकडूनच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असली तरी तो निर्णय या वर्षी होण्याची शक्यता नसल्याने या कोंडीतून मार्ग काढताना मुख्यमंत्र्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कर्जमाफीबाबत ठाम भूमिका घेतली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे सर्व दावे आणि तथाकथित उपाययोजना फोल ठरल्या आहेत. मागील अडीच वर्षांत आत्महत्यांचे सत्र कमी करण्यात आलेले अपयश, हाच सरकारच्या फसलेल्या योजनांचा पुरावा आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव प्रभावी आणि तातडीचा पर्याय शिल्लक राहिल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रात सुमारे नऊ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. आत्महत्येचे प्रमाण कमी होत नसल्याने कर्जमाफीची घोषणा करण्यात सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये. मुख्यमंत्री मागील एक वर्षापासून योग्य वेळी कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन देत आहेत; परंतु त्यांचा योग्य ‘मुहूर्त’ अद्याप उजाडला नसल्याने रोज अनेक हतबल शेतकरी आत्महत्या करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
कर्जमाफी करण्या संदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा दुसरी कोणतीही अधिक योग्य वेळ असू शकत नाही. सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास याच अधिवेशनात कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद करणे शक्य होऊ शकेल, असेही विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: