Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा कारागृहात बंदिवानाने मोबाईल वापरल्याचे प्रकरण उघड
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: lo3
तुरुंगाधिकार्‍याची बदली, इतरांची चौकशी सुरू
5 सातारा, दि. 14 : जिल्हा कारागृहामध्ये बंदिवानाने मोबाईल वापरल्याचे प्रकरण वरिष्ठ तुरुंगाधिकारी एम. के. अवघडे यांच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांची या पदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, बंदिवानाचे मोबाईल प्रकरण गृह खात्याने गांभीर्याने घेतले असून कारागृहातील पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी सुरू केली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोक्का कायद्याखाली पुण्यातील बंदीवान नीलेश घायवळकर सातारा जिल्हा कारागृहात कैदेत होता. त्याच्याकडे दि. 22 ते 23 फेब्रुवारीदरम्यान एक मोबाईल आणि सीम कार्ड सापडले होते. या मोबाईलचा त्याने वापर केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर तुरुंगाधिकारी वर्ग 1 निवृत्ती गवळी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 
त्यानुसार गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणाची माहिती वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर त्यांनी एम. के. अवघडे यांची बदली केली असून या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी या प्रकरणातील दोषी कर्मचार्‍यांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. याबाबत तुरुंगाधिकारी एम. एन. चौंदे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी बदली झाल्याच्या आणि चौकशी सुरू असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र चौकशी सुरू असल्याने अधिक बोलण्यास नकार दिला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: