Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका
ऐक्य समूह
Tuesday, March 14, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: mn2
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आमदारांना आदेश
5रत्नागिरी, दि. 13 (वृत्तसंस्था) : शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरी येथे दिली.
कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे. शेतकरी कर्जातून बाहेर पडला पाहिजे. त्याचा सातबारा उतारा कोरा झाला पाहिजे. ही मागणी कालही उद्धव  ठाकरे यांची होती आणि आजही तीच आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे अधिवेशन चालू देऊ नका, असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना दिले आहेत, असे रामदास कदम यांनी सांगितले.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून गेल्या आठवड्यात शेवटच्या तीन दिवसांमध्ये विरोधक आणि शिवसेनेने याच मुद्द्यावरून गोंधळ घालत विधिमंडळाचे कामकाज बंद पाडले होते. चार दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवारी (दि. 15) कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचा गदारोळ पहायला मिळू शकतो.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला होता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने तेथील शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्रातही याच मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच मुद्द्यावरून पुन्हा भाजपची कोंडी करण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. याबाबत मुख्यमंत्री किंवा भाजपच्या मंत्र्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: