Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बँक, एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध हटवले
ऐक्य समूह
Tuesday, March 14, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 13 (वृत्तसंस्था) : नोटाबंदीच्या निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर लादण्यात आलेले सर्व निर्बंध सोमवारपासून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता लोकांना त्यांच्या बँक खात्यातून किंवा एटीएममधून पूर्वीप्रमाणेच पैसे काढता येतील.
रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यातच या संदर्भात घोषणा केली होती. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात आले होते. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने दिवसाला 2000 आणि त्यानंतर 4000 रुपये काढता येतील, असा नियम सुरुवातीला जाहीर केला होता. एका आठवड्यात बँकेतून कमाल 24 हजार रुपये काढता येतील, असाही नियम लागू केला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईने सर्वसामान्यांचे हाल झाले होते. रिझर्व्ह बँकेने चालू (करंट) खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 1 फेब्रुवारीपासून मागे घेतल्याने व्यापारी आणि उद्योजकांना दिलास मिळाला होता. मात्र, बचत खात्यावरील मर्यादा कायम असल्याने सर्वसामान्यांसमोरील अडचणी कायम होत्या.
अखेर गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यावरील
मर्यादेत वाढ करून दिवसाला 10 हजार रुपये काढण्याची
मुभा दिली होती. मात्र, आठवड्याला फक्त 24 हजार रुपये काढता येतील, हा नियम कायम ठेवला होता. त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून
बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. 20 फेब्रुवारी ते 13 मार्च या काळात ही मर्यादा लागू होती. आता रिझर्व्ह बँकेने सर्व निर्बंध आजपासून मागे घेतले आहेत. त्यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी
अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता एटीएममधूनही कितीही पैसे काढता येणार आहेत. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: