Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिरळ परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड
vasudeo kulkarni
Tuesday, March 14, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: re2
वनविभागाची 6 जणांवर कारवाई, 4॥ लाखांचा मुद्देमाल जप्त
5पाटण, दि. 13 : कराड-चिपळूण हमरस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिरळ गावच्या हद्दीतील रस्त्याच्यालगत असणारी झाडे बेकायदेशीरपणे तोडल्या प्रकरणी पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने 6 जणांवर कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून तोडलेल्या झाडांसह ट्रॅक्टर, ट्रॉली, जनरेटर, कटर असा एकूण 4॥ लाख रुपयांचा मुद्देमाल पाटण वनविभागाने जप्त केला आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात बेकायदेशीरपणे वृक्षतोड कोठे होत असल्यास तत्काळ पाटण वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी केले आहे.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, कराड-चिपळूण हमरस्त्यावरील पाटणपासून दहा किलोमीटर अंतरावर  असणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील शिरळ गावाजवळील  रस्त्यालगत असणार्‍या झाडांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे तोड सुरू होती. याची माहिती पाटणच्या वनविभागाला समजल्यानंतर पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे, वनरक्षक जयवंत कवर, सुरेश पवार, यशवंत बनसोडे यांनी घटनास्थळी जावून बेकायदेशीर झाडांची कत्तल करणारे गणपत पांडुरंग लोहार (वय 56), राजाराम बबन चव्हाण (42), यशवंत बंडू घाडगे (50, सर्व रा. म्हावशी), विठ्ठल गणपत शिंदे, (50), बाळू कृष्णा देसाई (50, दोघे रा. राजवाडा), जगन्नाथ धोंडिबा देवरुखकर (45, रा. शिरळ) या 6 जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये वनविभागाने तोडलेल्या झाडांसह ट्रॅक्टर, ट्रॉली, कटर, जनरेटर, असा एकूण 4॥ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वनक्षेत्रपाल विलास काळे म्हणाले, कराड-चिपळूण रस्त्यालगत असणारी झाडे बांधकाम विभाग आणि वनविभाग यांची परवानगी न घेता तोडण्यात येत होती. यामुळे कराड-चिपळूण रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत असल्याने वाहतुकीत अडकलेल्या प्रवाशांनी शिरळ येथे वृक्षतोड होत असल्याची माहिती पाटण वनविभागाकडे दिली होती. त्यानुसार घटनास्थळी गेल्यानंतर झाडे तोडण्याचे काम सुरू होते. याबाबत त्यांना विचारले असता बांधकाम विभागाने रस्त्याकडील असणारी धोकादायक झाडे आम्हाला तोडण्यास परवानगी दिली असल्याचे सांगितले. मात्र याबाबत बांधकाम विभागाच्या  अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता अशी कोणतीही झाडे तोडण्याचा परवाना आम्ही दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. धोकादायक झाडांच्या नावाखाली चांगली झाडे तोडण्याचा उद्योग त्यांच्याकडे असणार्‍या जुन्या परवान्याद्वारे चालू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गणपत पांडुरंग लोहार, राजाराम बबन चव्हाण, यशवंत बंडू घाडगे, विठ्ठल गणपत शिंदे,  बाळू कृष्णा देसाई, जगन्नाथ धोंडिबा देवरुखकर या सहा जणांवर बेकायदेशीरपणे झाडे तोडल्या प्रकरणी कारवाई केल्याचे विलास काळे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: