Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंचायत समिती पदाधिकारी निवडीसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना
ऐक्य समूह
Tuesday, March 14, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: lo2
सभापती, उपसभापती निवडीचे अधिकार स्थानिक लोकप्रतिनिधींना
5सातारा, दि. 13 : सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवार, दि. 14 रोजी होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी शासकीय विश्रामगृहात विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आमदारांची बैठक झाली. यावेळी त्या-त्या तालुक्यातील सभापती व उपसभापती निवडीबाबतचे सर्वाधिकार स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देण्यात आले आहेत. 11 पैकी दहा पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीची सत्ता असून कराडच्या सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग राहणार की तेथे राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याची समीकरणे होणार याविषयी उत्सुकता आहे.
जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सोमवारी विश्रामगृहात नेत्यांची बैठक झाली. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर आणि  जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडी करताना कोणावरही अन्याय होणार नाही तसेच तालुक्यात पक्षाच्या दृष्टिकोनातून समन्वय राखण्यासाठी योग्य निवडी कराव्यात यावर चर्चा झाली. नाराजी आणि बंडखोरी रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत रणनीती आखण्यात आली.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे.
जिल्हा परिषदेच्या 64 जागांपैकी 39 जागा जिंकून राष्ट्रवादीने
निर्विवाद बहुमत मिळवले. एका अपक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा
दिल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ 40 वर पोहचले आहे.  11 पंचायत समित्यांपैकी 10 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. कराड तालुक्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या कराड विकास आघाडीस जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 3 जागा मिळाल्या आहेत. कराड पंचायत
समितीच्या सत्तेच्या चाव्या आ. उंडाळकर यांच्या हातात आहेत. त्यामुळे तेथे ते ज्याला बरोबर घेतील त्या गटाचा सत्तेत सहभाग
असणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: