Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात सभापतिपदाची लॉटरी मिलिंद कदम यांना लागणार
ऐक्य समूह
Tuesday, March 14, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: lo4
उपसभापतिपदासाठी लिंबच्या जितेंद्र सावंत यांना संधी शक्य
5सातारा, दि. 13 : सातारा तालुक्यातील पंचायत समितीच्या 20 पैकी 11 जागा जिंकून आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वर्चस्व  सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवड मंगळवारी होणार आहे. सभापतिपद हे इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने मिलिंद कदम यांना सभापतिीदाची लॉटरी लागणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. उपसभापतिपदावर लिंब येथील जितेंद्र सावंत यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
 सातारा तालुका पंचायत समितीमध्ये गेली दहा वर्षे राजघराण्याच्या मनोमीलनाची सत्ता होती. त्यामध्ये सभापतिपद आमदार गटाकडे तर उपसभापतिपद खासदार गटाकडे अशी वाटणी होती. आता मनोमीलन तुटल्याने दोन्ही पदे ठरवण्याचा अधिकार आमदारांना  आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या 20 जागांपैकी पाटखळ, शिवथर, लिंब, किडगाव, गोडोली, खेड, शेंद्रे, कारी, अंबवडे, अतीत, वर्णे या गणांमध्ये आमदारांचे तर खासदारांचे शाहूपुरी, तासगाव, कोडोली, संभाजीनगर, दरेखुर्द, कोंडवे या जागांवर वर्चस्व आहे.
वनवासवाडी, नागठाणे, अपशिंगे या जागा भाजपने खेचून घेतल्या आहेत. पदाधिकारी निवडीसाठी भाजप आणि खासदार गट एकत्र येण्याची शक्यता आहे.  तरीही त्यांचे संख्याबळ 9 पेक्षा जास्त होत नाही. त्यामुळे सभापती व उपसभापती दोन्ही पदे आमदार गटाकडेच राहणार आहेत.
ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंचपदाच्या माध्यमातून गेली 25 वर्षे कामकाजाचा अनुभव मिलिंद कदम यांच्याकडे आहे. कदम हे खेड गटात येत असले तरी पूर्वीपासून त्यांनी स्व. श्रीमंत अभयसिंहराजे यांच्यावर निष्ठा ठेवून काम केले आहे. उपसभापतिपदावर जिल्हा परिषदेमधील कामकाजाचा अनुभव असलेले लिंबचे जितेंद्र सावंत यांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: