Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

वाचाळवीरांचा शिमगा
vasudeo kulkarni
Saturday, March 11, 2017 AT 11:41 AM (IST)
Tags: ag1
महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातला कलगीतुरा चांगलाच रंगला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव, माजी मुख्यमंत्री मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी जाहीर सभात परस्परांची उणीदुणी काढत, एकमेकांवर चिखलफेक करत धुळवडही साजरी केली. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शिमग्या आधीच राजकारणी नेत्यांनी शिमगा साजरा केला. आता देशभर साजरा होणारा शिमगा सण उंबरठ्यावर आला असतानाच काही भंपक, नादान, विकृतीने पछाडलेल्या वाचाळवीरांनी केेलेल्या हिडीस आणि असभ्य वक्तव्यामुळे, या वेळचा शिमगा चांगलाच रंगणार, अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांनी अत्यंत अश्‍लाघ्य शब्दात जवानांच्या पत्नींचा अवमान-विटंबना करणार्‍या बेताल वक्तव्याने राज्यभर संतापाची लाट उसळली. महिला संघटनांनी आणि सेवानिवृत्त जवानांनी मोर्चे काढून परिचारकांच्या  वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्या विरोधात आंदोलनेही झाली. परिचारकांनी माफी मागितल्यावरही त्यांच्या अत्यंत घाणेरड्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत राहिले आणि विधानपरिषदेतही परिचारक यांच्या दुष्कृत्याचा सर्वच पक्षाच्या सदस्यांनी निषेध करत त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. जवानांच्या महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार्‍या परिचारक यांचा गुन्हा क्षम्य नसल्यानेच त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली, तरी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, अशी सभागृहाची मागणी असल्याने, दीड वर्षांसाठी त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या  चौकशीसाठी 9 सदस्यांची समितीही नेमण्यात आली. येत्या सहा महिन्यात या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून, ही समिती परिचारक यांच्यावरच्या कारवाईबाबतचा निर्णय घेईल आणि तसा अहवाल सभागृहाला सादर करील. या चौकशीत दोषी ठरल्यास, परिचारक यांचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते. त्यांना कारावासाची शिक्षा द्यायचा निर्णयही समिती आणि सभागृह घेऊ शकते. सत्तेचा माज चढलेल्या नेत्यांना जेव्हा आपण काय बोलतो आणि त्याचे परिणाम काय होतील, याचे भान राहत नाही, तेव्हा काय होऊ शकते, याचा धडा परिचारक यांचे सदस्यत्व निलंबित झाल्याने बाष्कळ-आचरटपणे बडबडणार्‍या नेत्यांना मिळावा, अशी अपेक्षा आहे.      

यांना अद्दल घडायला हवी
राज्यघटनेने सर्व भारतीयांना मूलभूत हक्काद्वारेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले असले, तरी गेल्या काही वर्षात या स्वातंत्र्याचा गैरवापर करणार्‍या उठवळ नेत्यांची संख्या वाढते आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक नीतिनियम, सामाजिक आदर, परंपरा, नीतिमूल्यांची निर्लज्जपणे होळी करणे नव्हे, हे या विकृतीने पछाडलेल्या आणि असली बेलगाम वक्तव्ये सवंग लोकप्रियता मिळवायसाठी सोकावलेल्या काही लोकांना मान्य नसल्यानेच, सामाजिक संघर्ष आणि वादळे निर्माण होत आहेत. राम गोपाल वर्मा या नीच वृत्तीच्या दिग्दर्शकाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केलेले हिडीस वक्तव्य म्हणजे केवळ भारतीयच नव्हे, तर जगातल्या आया-बहिणींच्या विटंबनेचा, त्यांच्या सहनशीलतेवर आणि मनोधैर्यावर घाला घालायचीच अक्षम्य घटना आहे.  गेल्या काही वर्षात गल्लाभरू चित्रपटांची लाटच हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झाली. पैसे मिळवायसाठी टीचभर चिंधी अंगावर असलेल्या नट्यांना उन्मादक आणि अर्धनग्न अवस्थेत झळकवायचे, त्यांचे मोकाट अंगप्रदर्शन घडवायचे, भारतीय परंपरेला चूड लावणार्‍या कामुक दृश्यांचा भडिमार करायचा, अशी नवीच लाट हिंदी चित्रपटसृष्टीत आधुनिक कलेच्या नावाखाली सुरू झाली. राम गोपाल वर्मा हा अशाच टोळक्यातला एक बेशरम आणि नालायक दिग्दर्शक! गेल्या काही वर्षात अपयशाचे तडाखे बसल्याने, हताश झालेल्या या विकृत दिग्दर्शकाने पाश्‍चात्य देशात ‘पोर्नो’ चित्रपटातल्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध असलेल्या सनी लियोनचा संदर्भ देत, तिचा उदोउदो तर केलाच, पण सर्व मर्यादा ओलांडून त्याने आया-बहिणींची तुलनाही या उठवळ नटीशी केली. कला आणि कलास्वातंत्र्याच्या, तथाकथित पुरोगामी विचारांच्या नावाखाली त्याने ट्विटरवर केलेले हे वक्तव्य, म्हणजे विकृतीचा आणि हिडीसपणाचा कळस होय! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरूनच या राम गोपालचे थोबाड सणसणीतपणे रंगवायची प्रतिक्रिया व्यक्त केली, तरी त्याचा माजुर्डेपणा काही संपलेला नाही. आव्हाड यांच्यासारख्या विदूषकाने दुसर्‍यांनी काय बोलावे, हे सांगू नये, असे प्रत्युत्तर त्याने दिल्यामुळेच, तुला आई आहे की नाही असा सवाल विचारत, आव्हाड यांनी तुला कुठे आणि कसा धडा शिकवायचा, तुला समजेल अशा भाषेत कसे सांगायचे, हे आम्हाला कळते, अशी व्यक्त केलेली प्रतिक्रिया सामान्य जनतेच्या संतप्त प्रतिक्रियांची अभिव्यक्तीच होय! या असल्या गटारात लोळणार्‍या डुकराला भर चौकात उलटे टांगूनच, मिरच्याची धुरी देऊन ठोकायला हवे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला आणि लोकांनीही जाहीरपणे व्यक्त केल्यास तो काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला मुळीच नसेल. या असल्या विकृतांना समाजाने कायदा हातात घेऊन अद्दल शिकवल्यास, त्याबद्दल समाजाला दोषी ठरवता येणार नाही. राम गोपालने समस्त महिला वर्गाचा असा अत्यंत घाणेरड्या शब्दात अवमान केल्याने, हिंदी चित्रपटसृष्टीतही संतापाची लाट उसळली. त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणावर तंत्रज्ञ आणि कर्मचार्‍यांनी बहिष्काराचे शस्त्रही उपसले आहे. राम गोपालला जोड्यांनी मारायलाच हवे, अशी सामाजिक लोकभावना असताना, राखी सावंत या उठवळ आणि निर्लज्ज नटीने राम गोपाल यांच्या वक्तव्याचे समर्थन करावे, ही आणखी एक विकृती होय! मी महाराष्ट्राला भिकारी करेन, पण मी भिकारी होणार नाही, असे जाहीर वक्तव्य करणारे शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत, हेही याच विकृतांच्या मालिकेत जाऊन बसले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडून कुणी जीभा सैल सोडत, महिला, महाराष्ट्र, सामाजिक आदर असलेली व्यक्तिमत्त्वे, यांचा अनादर-विटंबना करीत असेल तर आणि सरकारने या विकृतांवर कायदेशीर कारवाई केली नाही, तर खवळलेला समाजच त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देईल आणि त्याला हे असले वाचाळवीरच जबाबदार असतील.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: