Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

कॉपीचा रोग
vasudeo kulkarni
Thursday, March 09, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: ag1
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचे गैर प्रकार पूर्णपणे बंद पाडायचा डांगोरा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने पिटला असला, तरी काही परीक्षा केंद्रावर तथाकथित कडक बंदोबस्तात, सामूहिक कॉप्या झाल्याच्या घटना चव्हाट्यावर आल्या आहेत. या आधी बारावीच्या परीक्षेच्या काही विषयांच्या प्रश्‍नपत्रिका, परीक्षा सुरू होताच, अवघ्या दहा-पंधरा मिनिटांच्या आत आणि त्या आधी अर्धा तास सर्रास व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित झाल्याचे उघड झाले. मुंबई, ठाणे आणि अन्य शहरात आधी मराठी आणि नंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि गणित विषयाची प्रश्‍नपत्रिका फुटली. या प्रश्‍नपत्रिका सोशल मीडियावरून झपाट्याने प्रसारितही झाल्या. परीक्षा सुरू झाल्यावर प्रश्‍नपत्रिका सोशल मीडियाद्वारे फुटल्याची कबुली शालांत परीक्षा मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली असली, तरी हे कसे घडले आणि कुणी घडवले, या बाबत मात्र काहीही खुलासा या प्रकरणाची चौकशी करणार्‍या पोलिसांनी केलेला नाही. मुळातच परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडे परीक्षा सुरू असताना, व्हॉटसअ‍ॅपद्वारे प्रश्‍नपत्रिकांची छायाचित्रे कशी घेता आली? त्यांना मोबाईल वापरायची परवानगी कुणी दिली? या घोटाळ्यात कोण कोण सामील आहेत, या सार्‍यांची पोलिसांनी कसून चौकशी करायला हवी. परीक्षा केंद्रात कॉपीचे कागद, मार्गदर्शक पुस्तके आणि अन्य साहित्य नेण्यास परीक्षार्थींना पूर्णपणे बंदी असतानाही काही विद्यार्थ्यांकडे हे मोबाईल राहिलेच कसे? या सार्‍या घोटाळ्यात संबंधित परीक्षा केंद्रातले कर्मचारीही सामील असल्याशिवाय असे घडूच शकत नाही. विद्यार्थ्याबरोबरच पर्यवेक्षक, केंद्रचालक आणि परीक्षा केंद्रातल्या कर्मचार्‍यांनाही मोबाईल, स्मार्ट फोन वापरण्यावर बंदी घालायला हवी, त्याशिवाय ऐनवेळी प्रश्‍नपत्रिका फुटणार नाही. परीक्षा सुरू झाल्यावर किंवा त्याआधी प्रश्‍नपत्रिका फुटल्या, याचाच अर्थ परीक्षा नियंत्रणात अद्यापही गंभीर त्रुटी कायम आहेत, असाच होतो. कोणत्याही परिस्थितीत शालांत, उच्च माध्यमिक किंवा विद्यापीठीय परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका फुटणे, शिक्षणाच्या प्रक्रियेवरचा विश्‍वास उडण्यासारखाच प्रकार आहे, ही बाब राज्य सरकार आणि शालांत परीक्षा मंडळानेही लक्षात घ्यायला हवी. लष्कराच्या भरतीसाठी झालेल्या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटल्याचे आणि ती लक्षावधी रुपयांना विकली गेल्याचे उघड झाल्यावर, देशातल्या सर्वच केंद्रातली ही परीक्षाच रद्द करायची नामुष्की लष्करावर अलीकडेच आली. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या युवकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परीक्षा द्यायसाठी आणि अभ्यासासाठी परीक्षा केंद्राच्या शहरात दहा पंधरा दिवस आधी रहायचा, प्रवासाचा भुर्दंडही प्रामाणिक युवकांना बसला. या आधीही प्रश्‍न- पत्रिका फुटल्याच्या, प्रश्‍नपत्रिकांची विक्री करून आपले उखळ पांढरे करून घेतल्याच्या काही टोळक्यांच्या कारवाया उघड झाल्या होत्या. अशा स्थितीत बारावीच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्याने, शालांत मंडळाच्या व्यवस्थापनावरच प्रश्‍नचिन्ह उभे राहते.        

कॉपीचे नवे तंत्र
काही वर्षांपूर्वी लातूर शहर आणि जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सलग पाच वर्षे आल्याने, या नव्या लातूर अभ्यास आणि परीक्षेची तयारी करून घ्यायच्या तंत्राचा राज्यभरात प्रचंड गाजावाजा झाला होता.  या परीक्षेत आपल्या मुलांनी गुणवत्ता मिळवावी, यासाठीच हजारो पालक लातूरमधल्या माध्यमिक शाळात आणि शिकवणी वर्गात आपल्या मुला-मुलींना पाठवत होते. शालांत मंडळाने गुणवत्ता यादीची पद्धत बंद केली असली, तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 95 ते 98 टक्के गुण आपल्या मुलांनी मिळवायलाच हवेच, अशा महत्त्वाकांक्षेने बहुतांश पालकांना पछाडले असल्याने, खाजगी शिकवणी वर्गांचे पेव राज्यभरात फुटले आहे. आपल्याच शिकवणी वर्गाचे विद्यार्थी या परीक्षात कसे चमकले? त्यांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढला याच्या जाहिरातीही दिल्या जातात. पण गुणवत्ता मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची अशा खाजगी शिकवणी वर्गांची टक्केवारी किती याचा विचार मात्र सुशिक्षित पालकही करत नाहीत. सध्याची परीक्षा पद्धत ही फक्त पुस्तककेंद्रित आहे, याचेही भान जागतिक आव्हानांचा सामना करायसाठी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, अशा भ्रमात अडकलेल्या पालकांना नाही. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांना असाधारण महत्त्व कायम राहिले आहे. नांदेड, औरंगाबादसह मराठवाड्यातल्या परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणावर सामूहिक कॉपी होत असल्याचे पाच वर्षांपूर्वी उघड झाल्यावर, कॉपीमुक्त परीक्षेसाठी शालांत मंडळाने भरारी आणि बैठी नियंत्रण पथके स्थापन केली. परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्तही सुरू झाला. पण या वर्षी लातूर जिल्ह्यातल्या जळकोट या तालुक्याच्या ठिकाणाच्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर राजरोसपणे सामूहिक कॉपी झाल्याचे उघड झाले. परीक्षार्थींना कॉप्या पुरवण्यासाठी पालक आणि त्यांच्या मित्रांची झुंबड उडालेली होती. विद्यार्थ्यांनी बाकावर प्रश्‍नांची उत्तरे लिहून ठेवल्याचे प्रकार आढळल्यावर शालांत मंडळाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जमिनीवरच बसून उत्तरपत्रिका परीक्षार्थीनी लिहाव्यात, अशी पद्धत अंमलात आणली. पण औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाड सावंगी या गावातल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रात फरशीवर बसून दहावीच्या विद्यार्थ्यांनी घोळके करीत खुलेआम परस्परांना कॉपीसाठी मदत केल्याचे पुस्तके आणि मार्गदर्शकांची देवाण-घेवाण केल्याची घटना उघड झाली आहे. नंदुरबारच्या विसरवाडी या गावातल्या परीक्षा केंद्रात तर कॉपीचा महापूरच आला होता. या प्रकरणी शालांत मंडळाने, पाच अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबितही केले आहे. या केंद्रात मुलं आणि मुली परस्परांना कॉपीसाठी सहाय्य करत असतानाही, पर्यवेक्षक़, पोलीस, केंद्रप्रमुख, यातल्या कुणीही अडवले नाही. खुलेआम बाहेरचे लोकही विद्यार्थ्यांना कॉपी पोहोचवायसाठी ये-जा करत होते. कॉपी करण्यात फक्त मुलेच नव्हे, तर मुलीही आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे. कॉ्रपीमुक्त शालांत परीक्षांचा असा बोजवारा उडाल्याने, शालांत परीक्षा मंडळाची तथाकथित कडक उपाययोजना मोडीत निघाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: