Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
असीमानंद यांच्यासह नऊ जण निर्दोष
ऐक्य समूह
Thursday, March 09, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : अजमेर येथील दर्ग्याच्या आवारात ऑक्टोबर 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी स्वामी असीमानंद यांच्यासह नऊ जणांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) जयपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मात्र, या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नेते दिवंगत सुनील जोशी, देवेंद्र गुप्ता व भावेश पटेल यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषींना 16 मार्च रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असून न्यायालयाने देवेंद्र गुप्ता व भावेश पटेल यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 
अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या कम्पाऊंडमध्ये 11 ऑक्टोबर 2007 रोजी सायंकाळी 6.14 वाजता  झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार तर 30 जण जखमी झाले होते. पवित्र रमजान महिन्यातील नमाज अदा करून मुस्लीम नागरिक बाहेर पडत असताना हा स्फोट झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राजस्थान पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला होता. राजस्थान एटीएसने 20 ऑक्टोबर 2010 रोजी अजमेर न्यायालयात तीन आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केले होते. मात्र, 1 एप्रिल 2011 रोजी हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता. नवी दिल्लीत एनआयएच्या पोलीस ठाण्यात 6 एप्रिल 2011 रोजी गुन्ह्याची पुनर्नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने या खटल्यात जयपूर न्यायालयात 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 2002 मध्ये अमरनाथ यात्रा व जम्मूतील रघुनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कट्टर हिंदुत्ववाद्यांनी अजमेर दर्गा आणि हैद्राबादमधील मक्का मशीद येथे बॉम्बस्फोट घडवले होते. मुस्लिमांच्या रमजानच्या पवित्र महिन्यात धार्मिक भावना भडकवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा धोक्यात आणण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी हे कृत्य केले होते, असे एनआयएने या आरोपपत्रात म्हटले होते. या आरोपपत्रात स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, चंद्रशेखर लेवे, लोकेश शर्मा, मुकेश वासानी, हर्षद भारत, मोहनलाल रतिश्‍वर, संदीप डांगे, रामचंद्र, भावेश पटेल, सुरेश नायर, मेहुल आणि सुनील जोशी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात सुनील जोशी यांचे निधन झाले तर तिघे फरार आहेत. आधी 2011 मध्ये स्वामी असीमानंद हे या बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप एनआयएने केला होता. मात्र, नंतर असीमानंद यांच्याविरोधात पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले होते. या प्रकरणात असीमानंद यांचे नाव समोर येताच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला होता. त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान, असीमानंद यांनी ‘कारवाँ’ या मासिकाला 2014 मध्ये दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे या प्रकरणात नाव घेतले होते. अशा प्रकारचे स्फोट करणे महत्त्वाचे आहे; परंतु त्याचा कोणताही संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला जाऊ नये, असे वक्तव्य भागवत यांनी केल्याचे असीमानंद यांनी या मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीचा सारांश या मासिकाने बुधवारी आपल्या पत्रकाद्वारे प्रसिद्ध केला. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे आरोप फेटाळले असून असीमानंद यांच्या मुलाखतीच्या सतत्येवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. ही मुलाखत बनावट आणि अर्थशून्य असल्याची प्रतिक्रिया  संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: