Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

नैराश्याचा विळखा
vasudeo kulkarni
Tuesday, March 07, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: ag1
मुक्त आणि उदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमलबजावणीनंतर गेल्या 27 वर्षांत देशाची सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती सुरू झाली. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे, कृषी, उद्योग, व्यापार, शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास, वाहतूक, दूरसंचार सुविधा अशा सर्वच क्षेत्रातील  प्रगतीमुळे आर्थिक विकासाचा वेग वाढला. शहरी आणि ग्रामीण भागातील दरडोई उत्पन्न याच धोरणामुळे वाढल्याचा दावा केंद्र आणि राज्य सरकारांनी सातत्याने केला आहे. पण या विकासाबरोबरच चंगळवादी संस्कृतीही देशभरात प्रचंड फोफावली. ग्रामीण भागापर्यंत तिची पाळेमुळे रूजली. पाश्‍चात्य खाद्य पदार्थ आणि जीवनशैलीच्या वाढत्या प्रभावाने, नव्या विविध समस्या निर्माण झाल्या. व्यायामाचा अभाव, बैठे काम, पिझ्झा बर्गर, पास्ता या पदार्थांचा खाण्यात अधिक वापर, थंड पेये पिण्याचे वाढते प्रमाण, श्रीमंतीबरोबरच वाढती व्यसनाधिनता आणि हवा-पाण्याच्या प्रदूषणामुळे भारतात लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, अशा विकारांची लागण झाली. या विकारांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या कोट्यवधींची झाली. आता या विकाराबरोबरच भारतात नैराश्याच्या विकाराचा पाच कोटी लोकांना विळखा पडल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. कर्करोग, मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा या विकारांच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने सार्‍या जगभर वाढत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील आरोग्य संघटनाही सामाजिक प्रबोधन, प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणत असल्या तरी, अदृश्य अशा नैराश्य आणि चिंताग्रस्त मानसिक आजाराचे प्रमाण भारतात सर्वाधिक वाढत असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. जगभरात 322 दशलक्ष लोकांना नैराश्याच्या विकाराने ग्रासले आहे. त्यातले निम्मे रुग्ण भारतातील आहेत, ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब होय! नैराश्याच्या विळख्यात अडकलेले मानसिक रुग्ण आत्महत्याही करतात. भारतात होणार्‍या आत्महत्या मागे नैराश्य आणि चिंता ही दोन मोठी कारणे असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. 2012 मध्ये जगात सर्वाधिक़ आत्महत्या भारतात झाल्या आणि त्यातील दहा टक्क्यांच्यावर आत्महत्यांचे कारण नैराश्य, हेच होते. विशेष म्हणजे नैराश्य आणि चिंताग्रस्तता ही लक्षणे पुरूषापेक्षा स्त्रीयात अधिक आढळल्याचाही या अहवालाचा निष्कर्ष आहे. केंद्र आणि राज्य सरकारे सार्वजनिक आरोग्यासाठी, वैद्यकीय सेवेसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्याबरोबरच, ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सेवेचे जाळे पोहोचवण्यासाठी अधिक खर्च करीत आहे. पण तरीही मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि नैराश्याच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येवर मात्र नियंत्रण आले नसल्यानेच, नैराश्याच्या या नव्या संकटाशी सामना करायचे गंभीर आव्हान समाज आणि सरकारसमोर उभे आहे.     

मानसिक तणाव
स्वातंत्र्यापूर्वी भारत हा गरीब आणि अविकसित देश होता. बहुतांश शेतकरी वर्ग कर्जबाजारीच होता. दुष्काळ, अवर्षण, महापूर, नापिकी, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती दयनीय होती. कारखानदारी आणि शहरी भागाचा विकासही झालेला नव्हता. 70 टक्क्यांच्यावर लोक गरीबच होते. पण तेव्हा संकटावर मात करत, जगायची जिद्द मात्र जनतेत होती. आत्महत्यांचे प्रमाण खूपच कमी होते. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा अशा विकाराने ग्रासलेल्या रुग्णांची टक्केवारी लोकसंख्येच्या दोन तीन टक्के इतकीच होती. रुग्णालयांची संख्याही कमी होती. पण विविध क्षेत्रातल्या विकासानंतर लोकांचे राहणीमान सुधारले. मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती चांगली झाली. शेतीमालाला उत्पादन खर्चाशी सांगड घालून भाव मिळत नसल्याने, शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा कायम राहिला तरी, काही टक्के शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारली. देशात हरितक्रांती यशस्वी झाली. ग्रामीण आणि दुर्गम भागातही मोठे उद्योग सुरू झाले. शिक्षणाचा प्रसार झाला. ग्रामीण भाग बारमाही रस्त्यांनी जोडला गेला. गेल्या दहा वर्षात तर, दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे 80 टक्के भारतीयांच्याकडे मोबाईल आला. ग्रामीण भागातही नवश्रीमंतांचा नवा वर्ग निर्माण झाला. भारत विकसनशील देश झाला. पण या विकासाची फार मोठी किंमत समाजाला आणि देशाला मोजावी लागेल, याचे भान केंद्र आणि राज्य सरकारांना राहिली नाही. जंगलांचा र्‍हास झाला. वृक्षराजीची प्रचंड कत्तल झाली. औद्योगिक आणि शहरांचे सांडपाणी थेट नद्यात सोडले जात असल्याने, देशातील गंगा-यमुनेसह जीवनदायिनी नद्यांचे प्रवाहही प्रदूषित झाले. नद्यांच्या शुध्दीकरणासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प अंमलात आले असले तरी, नद्यांचे हे प्रदूषण थांबलेले नाही. वाहनांची संख्याही कोट्यवधींनी वाढली. कारखाने आणि वाहनांच्या विषारी धुरामुळे हवाही प्रदूषित झाली. पिकावर फवारल्या जाणार्‍या कीड नाशकांच्यामुळे, जमिनी विषारी झाल्या. पर्यावरणाचा समतोल ढासळत केला. तापमानाचे प्रमाणही वाढले. लोकांच्याकडे पैसा आला म्हणजे जीवन सुखी होत नाही. चंगळवादी संस्कृतीमुळे आणि दारूविक्री खुली झाल्याने, दारू पिणार्‍या लोकांची संख्याही वाढली. सिगारेट, तंबाखूच्या व्यसनात युवा पिढीही अडकायला लागली. गलेलठ्ठ पगाराची नोकरी, उत्तम घर, आर्थिक स्थैर्य, स्वत:च्या मालकीची चार चाकी गाडी, अशी सारी आर्थिक संपन्नता असतानाही, या नवश्रीमंत मध्यवर्गीयांनाही निराशेने ग्रासले आहे. मानसिक तणाव, अधिक कामामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य बिघडण्याबरोबरच, त्यांना विविध चिंता भेडसावत आहेत. नितीमूल्यांची घसरण झाल्यामुळे चंगळवादी संस्कृतीचा झपाट्याने प्रसार झाला. या तथाकथित सुखाच्या संकल्पना वास्तव नाहीत, याचे भान या नवश्रीमंतांतील लाखो लोकांना नाही. सुखाच्या काल्पनिक मृगजळामागे धावता धावता त्यांच्या जीवनाचे स्वास्थ्यच हरपले असल्यानेच, नैराश्याच्या विळख्यात अडकणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना निरामय आरोग्य आणि नीतिमूल्यांची, संस्काराची शिकवण दिल्याशिवाय, देशाच्या सामाजिक स्वास्थ्याला निर्माण झालेल्या या गंभीर धोक्यावर मात करता येणार नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: