Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अडवाणींवरील गुन्हे मागे घेण्यावर सुप्रीम कोर्टाचे प्रश्‍नचिन्ह
ऐक्य समूह
Tuesday, March 07, 2017 AT 11:08 AM (IST)
Tags: na1
बाबरी मशीद प्रकरणी 22 मार्चला सुनावणी
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर आले असतानाच बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी कटासह इतर गुन्ह्यांमधून तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे या तिघांवरील आरोप वगळण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्‍न उपस्थित केले असून या प्रकरणी 22 मार्चला सुनावणी होणार आहे.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती, राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंग, ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य लोकांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले होते. त्याला सीबीआय आणि मूळ तक्रारदार हाजी महबूब अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अडवाणी व इतरांना दोषमुक्त ठरवण्याचा निर्णय आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही सीबीआयला अडवाणींसह 13 जणांवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यास परवानगी देऊ, असे सोमवारी झालेल्या सुनावणीत न्या. पी. सी. घोष आणि न्या. आर. एफ. नरीमन यांच्या खंडपीठाने सांगितले.  त्यामुळे 22 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा  निर्णय बदलल्यास या नेत्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. रायबरेली येथील विशेष न्यायालयाने नेत्यांविरुद्ध असलेले आरोप तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे काढून टाकले होते. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबतच सतीश प्रधान, विहिंपचे दिवंगत नेते अशोक सिंघल, गिरिराज किशोर, साध्वी ऋतंभरा, व्ही. एच. दालमिया, महंत अवैद्यनाथ, आर. व्ही. वेदांती, परमहंस रामचंद्र दास, जगदीश मुनी महाराज, बी. एल. शर्मा, नृत्यगोपाल दास, धरम दास, सतीश नागर आणि मोरेश्‍वर सावे यांच्याविरोधातील आरोप हटवण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे नाव आरोपींच्या यादीतून त्यांचे वगळण्यात आले होते. बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा पाडल्याची दोन प्रकरणे आहेत. यातील एक प्रकरण 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडताना अयोध्येतील रामकथा कुंजच्या मंचावर उपस्थित असलेल्या अडवाणी आणि इतरांविरोधात आहे तर दुसरे प्रकरण मशिदीच्या वादग्रस्त ढाच्याजवळ उपस्थित असलेल्या लाखो कारसेवकांविरोधात आहे. सीबीआयने अडवाणींसह 20 जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या 153 (अ) (दोन समुदायांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे), 153 (ब) (राष्ट्रीय एकतेचे नुकसान करणे) आणि 505 (सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी किंवा दंगल भडकवण्यासाठी खोटी विधाने करणे, अफवा पसरवणे) या आरोपांखाली आरोपपत्र दाखल केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: