Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Monday, March 06, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: na2
एक पोलीस शहीद; सहा जवान जखमी
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात शनिवारी रात्रीपासून तब्बल 15 तास झालेल्या चकमकीत राज्य पोलीस व लष्कराच्या संयुक्त पथकाने दोन दहशतवाद्यांना रविवारी कंठस्नान घातले. मात्र, या चकमकीत दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याचे विशेष प्रशिक्षण घेतलेले उरी येथील पोलीस कर्मचारी मंझूर अहमद नायक हे शहीद झाले तर लष्कराच्या मेजर पदावरील अधिकार्‍यासह सहा जवान जखमी झाले आहेत. यामध्ये एका मेजर एका अधिकार्‍याचा देखील समावेश आहे.
त्राल परिसरात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून एका सुताराच्या घरात आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप, केंद्रीय राखीव पोलीस दल व लष्कराच्या संयुक्त पथकाने शनिवारी सायंकाळपासून परिसराला वेढा घातला. या भागात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यातच या कारवाईत अडथळे आणण्यासाठी स्थानिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक सुरू केली. काही लोकांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या ‘इन्सास’ बंदुका हिसकावून घेत पलायन केले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी स्थानिकांवर कारवाई करून त्यांना पिटाळून लावले.
या स्थितीतही भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांकडून तीव्र गोळीबार सुरूझाल्याने सुरक्षा दलांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. 42 राष्ट्रीय रायफल्सचे पथकही या मोहिमेत सहभागी झाले. तब्बल 15 तासांच्या चकमकीनंतर अखेर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील आकीब भट उर्फ आकीब मौलवी हा ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. दुसर्‍या दहशतवाद्याचे नाव सैफ-उल-लाह उर्फ ओसामा असे असून तो ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचे काम करत होता. तो पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. 
विशेष म्हणजे ही चकमक सुरू असताना भटने रविवारी पहाटे आपल्या वडिलांना फोन करून शेवटचा ‘अलविदा’ करत असल्याचे सांगितले होते. या चकमकीत लष्कराचे मेजर आर. रेशी यांच्या शरीरात गोळ्या घुसल्या असून त्यांना लष्करी तळावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जीवावरील धोका टळल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा दहशतवादी बुर्‍हान वणी हा लष्कराच्या कारवाईत ठार झाल्यानंतर त्राल परिसर पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. या भागात अजूनही अशांतता असून अधूनमधून दहशतवादी कारवाया सुरू असतात. दहशतवाद्यांना सुरक्षितरीत्या पळून जाता यावे यासाठी सुरक्षा दलांच्या मोहिमांदरम्यान स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलने करत असल्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत.
गूढ स्फोटात तीन बालके जखमी
दरम्यान, उत्तर काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोर परिसरातील पझलपोरा हर्दशिव येथे लष्कराच्या मुख्य छावणीनजीक रविवारी झालेल्या गूढ स्फोटात साहील रशीद लोन, आकाश रियाज व शाकीय हुसेन ही तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, त्राल परिसरात लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाल्यानंतरच ही घटना घडल्याने या स्फोटाबाबत संशय व्यक्त होत आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईचा बदला घेण्यासाठी ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांनी लष्करी तळाजवळ स्फोटके टाकली असावीत. या स्फोटकांशी स्थानिक मुले खेळत असताना हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: