Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खूशखबर
ऐक्य समूह
Monday, March 06, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: na3
महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ होणार
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच खूशखबर मिळणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात लवकरच दोन ते चार टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचारी व 58 लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे.
सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारावर महागाईमुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी महागाई भत्ता देण्यात येतो. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात लवकरच दोन ते चार टक्के वाढ करण्यात येणार असून ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारीपासून देण्यात येणार आहे. मात्र, या प्रस्तावित वाढीवर केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्याची महागाई पाहता ही वाढ पुरेशी नसल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने मान्य केलेल्या सूत्रानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारीपासून दोन टक्के वाढ होणार आहे. मात्र, औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय-आयडब्ल्यू) अनुषंगाने ही वाढ क्षुल्लक आहे, असे केंद्र सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष के. के. एन. कुट्टी यांनी सांगितले. केंद्र सरकारने मान्य केलेल्या सूत्रानुसार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या 12 महिन्यांच्या कालावधीतील किरकोळ महागाईची सरासरी विचारात घेऊन केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते. गेल्या वर्षी 1 जुलै रोजी महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यात येणार आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनावर 6 ते 125 टक्के महागाई भत्ता वाढ केली होती. त्यानंतर सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला होता. सध्या केंद्रीय
कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना 1 जुलै 2016 पासून दोन टक्के महागाई भत्ता मिळत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: