Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

बेळगावात मराठी झेंडा
vasudeo kulkarni
Saturday, March 04, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: ag1
बेळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी भाषक नगरसेवकात फूट पाडून, ही महापालिका काबीज करायची कन्नडिगांची कटकारस्थाने  मराठी भाषकांच्या एकजुटीने पुन्हा उधळलली गेली. या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि मराठी भाषकांनी अस्मितेच्या बनवलेल्या निवडणुकीत मराठी भाषक नगरसेवकांची एकजूट अभेद्य राहिल्यानेच, महापौरपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संज्योत बांधेकर आणि उपमहापौरपदी नागेश मंडोळकर बहुमताने विजयी झाले. मराठ्यांच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या संग्रामात अभिमानाचे, प्रेरणेचे प्रतीक असलेला बेळगाव महापालिकेवर मानाने फडकत असलेला भगवा झेंडा, कन्नड सरकारनेच मराठी भाषेच्या आणि भाषकांच्या द्वेषापोटीच काढून टाकला. पण बेळगाव महापालिकेवरचा मराठीचा झेंडा अदृश्यपणे फडकतच राहिला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जंग जंग पछाडून, सत्ता-जुलूमशाहीचा वरवंटा फिरवून, धनशक्तीचा वापर करूनही, मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारला बेळगाव शहरावरचे मराठी भाषकांच्या वर्चस्वाचे खच्चीकरण करता आलेले नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडून, गद्दारांच्या मदतीने महापालिका जिंकायचे कन्नडिगांचे प्रयत्नही असफल झाले आहेत. मराठी भाषकांच्या वज्रमुठीमुळे कन्नड सरकार आणि कन्नडिगांची कुटिल कारस्थाने यशस्वी झालेली नाहीत. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखालीच 32 मराठी भाषक निवडून आल्यामुळे कन्नड भाषकांचा जळफळाट झाला होता. गेल्या वर्षीही मराठीच महापौर आणि उपमहापौर होते. या वेळच्या या पदांच्या निवडणुकांच्या आधी दहा मराठी नगरसेवकांनी कन्नडिगांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला साथ देत समविचारी आघाडीच्या नावाखाली वेगळा गट स्थापन केल्याने, कन्नड भाषकांना बेळगाव महापालिका जिंकायची दिवास्वप्ने पडली होती. याच निवडणुकीत आमदार, खासदारांनाही मतांचा अधिकार असल्याने, कन्नड भाषक आणि उर्दू भाषक गटांच्या नगरसेवकांची आघाडी करून, मराठी भाषक फुटीर नगरसेवकांच्या पाठिंब्यावर कन्नड भाषक महापौर निवडून आणायचा चंग कन्नडिगांनी बांधला होता. पण बेळगावातल्या मराठी भाषकांनी कन्नड महापौर झाल्यास अद्दल घडवायचा इशारा या दहा नगरसेवकांना दिल्यामुळे, या तथाकथित समविचारी मराठी नगरसेवकांना धडकी भरली होती. 58 नगरसेवकांच्या या सभागृहात कानडी आणि उर्दू म्हणून 26 आणि 32 नगरसेवक मराठी भाषक आहेत. पण तरीही मराठी भाषकांचे बहुमत असतानाही फोडाफोडी करून बेळगाव महापालिकेत कन्नड भाषक महापौर करायसाठी कर्नाटक सरकारचीच आणि कन्नड भाषक संघटनांची फूस होती. मराठी भाषक नगरसेवकात फूट पडल्याने, बेळगावसह सीमाभागात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. अशा स्थितीत आमदार संभाजी पाटील यांनी मराठी भाषक नगरसेवकांना, तुम्हाला मराठी भाषेची आणि मराठी भाषकांची आण आहे. गद्दारी करू नका, असा इशारा दिल्याने, फुटीर नगरसेवकांनीही एकीकरण समितीच्याच उमेदवारांना मते दिली आणि महापालिकेवर मराठी भाषकांची सत्ता कायम राहिली आहे.    

एकजूट कायम हवी
1984 मध्ये बेळगाव नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होण्यापूर्वी, या नगरपालिकेवर परंपरेने मराठी भाषकांचेच वर्चस्व कायम होते. त्यानंतर आतापर्यंत 22 मराठी भाषक महापौर निवडून आले. बेळगाव शहराचे कन्नडीकरण करायसाठीच कर्नाटक सरकारने या नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करून, परिसरातल्या कन्नड आणि उर्दू भाषक मतदारांच्या बळावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे परंपरागत वर्चस्व उखडून काढायचा निर्धारही केला होता. पण मराठी भाषक मतदारांच्या  एकजुटीने सातत्याने महापालिकेत मराठी भाषक नगरसेवकांचेच बहुमत कायम राहिले. मराठी भाषकांच्या ताब्यातली ही महापालिका कर्नाटक सरकारच्या डोळ्यात सातत्याने खुपत असल्यानेच, 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनी महापौरांनी मराठी भाषकांच्या मोर्चात भाग घेतल्याचे कारण दाखवून, सरकारने ही महापालिका बरखास्तही केली होती. पण ही बरखास्ती कर्नाटक उच्च न्यायालयानेच बेकायदा ठरवली होती. 1956 मध्ये बहुसंख्यक मराठी भाषक असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, हा भाग केंद्र सरकारने सक्तीने कर्नाटक राज्यात सामील केला. तेव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमा भागातल्या मराठी भाषकांनी, आपला भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा, यासाठी गेली पन्नास वर्षे प्रदीर्घ काळ उग्र लढा सुरूच ठेवला आहे. बेळगाव, खानापूरसह या भागातून पाचही आमदार महाराष्ट्र एकीकरण समितीचेच निवडून येत असत. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पडली. सत्तासंघर्षाच्या किळसवाण्या राजकारणात मराठी भाषकच विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात उभे ठाकले. मराठी भाषक मतदारात पडलेल्या फुटीचा लाभ उठवत, आधी काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्षाने एकीकरण समितीच्या जागा जिंकल्या. बेळगाव शहरावर समितीचे वर्चस्व कायम  राहिले असले तरी फुटीच्या राजकारणांनी निपाणी भागात मात्र मराठी भाषकांची एकजूट आता राहिलेली नाही. परिणामी संपूर्ण सीमा भागातल्या मराठी भाषक विभागात एकीकरण समितीचा दबदबा कमी झाला आहे. मराठी भाषकांनीच करंटेपणाने सत्तेच्या राजकारणासाठी अन्य राजकीय पक्षांचा आश्रय घेतल्यामुळे, महाराष्ट्र एकीकरण समितीची एकजूट अभेद्य राहिली नाही. एकीकरण समितीत हा अंतर्गत संघर्ष, फाटाफूट आणि दुफळी झाली नसती, तर कन्नडिगांना मराठी भाषकांना आव्हान द्यायचे धाडसही झाले नसते. बेळगाव गिळंकृत करायसाठी कर्नाटक सरकारने या शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन, विधानसभेचे एक अधिवेशनही भरवायला सुरुवात केली आहे. विधानसौधची भव्य इमारतही याच परिसरात बांधली आहे. सीमाभागातल्या मराठी शाळा आणि संस्था बंद पाडायची मराठी भाषकांवर कन्नडच्या सक्तीचा वरवंटा फिरवायची सारी कारस्थाने झोटिंगशाहीच्या बळावर सुरूच आहेत. मराठी भाषकांनी आपली एकजूट कायम ठेवल्याशिवाय, त्यांच्या झुंजीला यश येणार नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: