Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

ट्रंपशाहीचा तडाखा
vasudeo kulkarni
Thursday, March 02, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: ag1
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, डोनाल्ड ट्रंप यांनी सात मुस्लीम राष्ट्रातल्या नागरिकांना प्रवेशावर बंदी घालून, जगातल्या अन्य राष्ट्रांतल्या नागरिकांसाठीही  रहिवासाचे नियम अधिक कडक केले जातील, असे जाहीर केले होते. अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना, अमेरिकेचे पारंपरिक उदारमतवादी धोरण फेकून देऊ आणि अमेरिकेत अमेरिकन जनतेच्या-उद्योगांच्या हितालाच अग्रक्रम देऊ, असे आक्रमक आश्‍वासन मतदारांना दिले होते. त्यांच्या त्या प्रचार मोहिमेतल्या चिथावणीखोर-दाहक भाषणावर अमेरिकेतल्या वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे-सामाजिक संस्था-संघटनांनी टीकाही केली होती. पण त्यांनी कशाचीही-कुणाचीही पर्वा न करता आपलेच घोडे पुढे दामटले होते. अध्यक्ष झाल्यावर त्यांचा आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा कमी होईल, ही अपेक्षाही फोल ठरली. अध्यक्षपद स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभरात त्यांनी अमेरिकेच्या जुन्या जागतिक धोरणाचा त्याग करून, अमेरिका धार्जिणेपणा हेच परराष्ट्र धोरण असेल आणि त्यालाच अग्रक्रम दिला जाईल, अशी घोषणा केली. आता अध्यक्ष झाल्यावर काँग्रेसच्या सभागृहात केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी आक्रमक धोरणाचा पुनरुच्चार करीत, आपले प्रशासन हे कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन जनतेच्या हिताशी तडजोडी करणार्‍या जुन्या परंपरेला जुमानणार नाही, असे खणखणीतपणे सांगितल्याने, ट्रंपशाहीचा कारभार भारतासह जगातल्या अनेक राष्ट्रांना तडाखे देणारा असेल, याची प्रचिती आली आहे. सुदान, सीरिया, इराण, येमेन, सोमालिया, लिबिया, इराक या देशातल्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देण्यावर बंदी घालणार्‍या त्यांनी काढलेल्या अध्यादेशाला काही प्रांतांच्या उच्च न्यायालयांनी स्थगिती दिली असली, तरी या निर्णयात काहीही बदल होणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. या पुढच्या काळात अमेरिकेतल्या बेकारांना देशातल्या कंपन्या आणि संस्थांनी अग्रक्रमाने नोकर्‍या दिल्याच पाहिजेत, त्यात कोणतीही सवलत मिळणार नाही. अमेरिका हा देश आधी अमेरिकन जनतेचा आहे. या देशातल्या साधनसंपत्तीवर त्यांचाच सर्वाधिक अधिकार असल्याने, त्यांना आधी न्याय आणि हक्क मिळायलाच हवा. जगातल्या अन्य राष्ट्रांनी घुसखोर आणि निर्वासितांना प्रवेश रोखणारी यंत्रणा अंमलात आणली. त्या कायद्याची कडकपणे अंमलबजावणीही केली. पण अमेरिकेत मात्र तसे घडले नाही. परिणामी अमेरिका ही निर्वासित आणि बेरोजगारांसाठी, जगातल्या लक्षावधी लोकांसाठी धर्मशाळा झाली. आओ-जाओ घर तुम्हारा, अशी स्थिती निर्माण झाल्यानेच, अमेरिकेतली बेकारी वाढत 90 दशलक्षावर गेली. बेकारांची संख्या प्रचंड वाढली आणि त्या नोकर्‍या परकीयांनी बळकावल्या. त्यांना पोसायचा धंदा अमेरिकेत यापुढे चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी या नव्या धोरणाचे जोरदारपणे समर्थन केले असल्याने माहिती तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात नोकर्‍या करणार्‍या लाखो भारतीयांसह जगातल्या अन्य नोकरदारांच्या नोकर्‍यांवर संक्रांत येण्याची शक्यता अधिकच गंभीर झाली आहे.   

अमेरिकेच्या हिताला अग्रक्रम
निवडणुकीच्या प्रचारात आणि अध्यक्ष झाल्यावरही ट्रंप यांनी परकीयांना नोकर्‍या दिल्या गेल्यानेच, अमेरिकन युवकांचा नोकर्‍यांचा हक्क डावलला गेला, असा धोशा कायम ठेवल्यानेच, अमेरिकेत वर्ण-वांशिक विद्वेषाच्या विषाची फेरपेरणी सुरू झाली.परदेशी-विशेषत: अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांच्याबद्दल द्वेषाचे वातावरण अधिकच वाढले. कन्सास शहरात श्रीनिवास कुचिबोटला या भारतीय अभियंत्याचा विद्वेषाच्या भडकलेल्या सामाजिक स्थितीमुळे बळी गेला. त्या शहरातल्या एका हॉटेलमध्ये या निरपराध अभियंत्याचा गोळ्या घालून खून झाल्याने, अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी ट्रंप यांच्या आगलाव्या भाषणे आणि धोरणानेच देशाचे वातावरण वंशविद्वेषी झाल्याचा ठपका ठेवला आहे. आता काँग्रेसमध्ये भाषण करताना मात्र ट्रंप यांनी श्रीनिवास यांच्या खुनाचा निषेध केल्यावर, सभागृहाने एक मिनीट शांतताही पाळली. आमच्या देशात सामाजिक एकतेबरोबरच विद्वेष आणि वांशिक भेदभावाची निंदा केली जाते. या धोरणात काहीही बदल झालेला नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली असली, तरी अमेरिकेतल्या विविध धर्मांच्या आणि पंथांच्या अल्पसंख्यकांना सुरक्षितता मिळेल, त्यांचे जीवित धोक्यात येणार नाही, असे मात्र सांगितलेले नाही, ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब होय! मुस्लीम, ख्रिश्‍चन धर्मीयांसह इसिस या दहशतवादी संघटनेने हजारो निरपराध्यांच्या क्रूरपणे कत्तली घडवल्या आहेत. ही संघटना सार्‍या मानवतेचीच आणि जगाचीही शत्रू असल्याने, तिचा समूळ नायनाट करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. पण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेत धर्मांध दहशतवाद्यांना प्रवेश-थारा मिळणार नाही, यावरही त्यांनी भर दिला. अमेरिकेने आतापर्यंत दुसर्‍या राष्ट्रांच्या सीमांचे रक्षण केले. पण अमेरिकेच्या सीमा मात्र सार्‍यांसाठी खुल्या राहिल्या. यापुढे ते चालणार नाही. अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमेवरून म्हणजेच मेक्सिकोतून होणारी प्रचंड घुसखोरी पूर्णपणे रोखायसाठी या सीमेवर कुंपण घालायचे सुरू झालेले काम गतिशीलपणे पूर्ण केले जाईल. या उपाययोजनेमुळेच अमेरिकन जनता सुरक्षित राहील, असा दिलासाही त्यांनी दिला. या पुढच्या काळात अमेरिका पुन्हा महासत्ता व्हावी, यासाठी संरक्षण खर्चात दहा टक्के वाढ करण्याबरोबरच लष्कराचे शुद्धीकरण आणि ते शक्तिशाली बनवले जाईल असे सांगत अमेरिकन जनतेच्या भावनांनाही फुंकर घातली आहे. अमेरिकन वस्तूंची खरेदी करा, अमेरिकेतच निर्मिती करा आणि अमेरिकन लोकांनाच नोकर्‍या द्या, असे आवाहन करत, त्यांनी याच धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असेही सांगितले. चीनच्या जागतिक विस्तारवादी धोरणांना लगाम घालणारे धोरण अंमलात आणले जाईल, इस्त्रायलशी मैत्रीचे संबंध अधिकच दृढ केले जातील, असेही या भाषणात सांगितले आहे. जागतिक मंदीमुळे बंद पडलेले मोठे कारखाने आणि उद्योग सुरू केले जातील. त्यासाठी त्या कंपन्यांना सरकार आर्थिक सहाय्य करील. अंमली पदार्थांची चोरटी आयात कठोरपणे रोखली जाईल, असे सांगून त्यांनी अमेरिकेत रहायची परवानगी मिळाल्यावर ज्या लोकांना नोकर्‍या मिळाल्या, प्रतिष्ठा मिळाली, त्यांना अमेरिकन परंपरा आणि मूल्यांचा सन्मान करावाच लागेल, असे ही त्यांनी आक्रमकपणे जाहीर केले असल्याने, त्यांच्या कारकिर्दीत परकीयांना नोकर्‍या देण्यावरचे निर्बंध अधिकच कडक केले जातील, हे निश्‍चित झाले आहे. ट्रंपशाहीमुळे अमेरिकेच्या पारंपरिक उदारमतवादी धोरणाला आता जगाच्या राजकारणात काहीही अर्थ राहिलेला नाही. कारण ट्रंप यांनी ते गुंडाळून व्हाईट हाऊसच्या बाहेर फेकून दिले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: