Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विश्‍वभाषेवर प्रेम करताना मातृभाषेची अवहेलना करू नका : दवणे
ऐक्य समूह
Saturday, January 02, 2016 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 1 : आपली भाषा सुंदर आहे. तिच्यावर आपल्या आईसारखे प्रेम करा. आई वृद्ध झाली म्हणून आपण तिला वृद्धाश्रमात ठेवत नाही. भाषेचेही तसेच आहे. आज ती दुबळीझाली असून तिला अमृत आणि तारुण्य आपणच दिले पाहिजे. मी मराठीवर प्रेम करतो म्हणून दुसर्‍या भाषेचा तिरस्कार करायला सांगणार नाही. पण विश्‍वभाषेवर प्रेम करताना मातृभाषेची अवहेलना करू नका, असा सल्ला प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे यांनी दिला.
जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 17 व्या ग्रंथ महोत्सवाचे  उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रवीण दवणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अमित कदम, ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह प्राचार्य डॉ यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, वि. ना. लांडगे, प्रदीप कांबळे, साहेबराव होळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रवीण दवणे पुढे म्हणाले, आज निसटून जाऊ पाहणारी वाचन संस्कृती धरून ठेवली पाहिजे व ते धरून ठेवण्याचे काम सातारची ग्रंथ महोत्सव समिती करत आहे. आमच्या काळात आकाशवाणीचे साधन आम्हाला देववाणीसारखे होते. त्यातूनच आम्ही घडलो.  आज पालकांनी शिक्षकाची व शिक्षकांनी पालकाची भूमिका वठवत विद्यार्थी घडवले पाहिजेत. हल्ली नको त्या जाहिरातींचा मारा बालमनावर होत आहे. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपमध्ये सगळे जण सतत गुंतलले आहेत. त्यामुळे विज्ञानही सापाच्या रूपात पुढे उभे राहते का, असा प्रश्‍न पडत आहे.  अशावेळी फेसबुकपेक्षा बुकफेस जास्त महत्त्वाचे आहे. आज आपल्या मुलाचां संघर्षच उरला नाही. जिथे संघर्षच उरला नाही तिथे जीवन निरर्थक ठरते.
मराठी मुलांबरोबर मी किती दिवस मराठीत बोलणार, असा प्रश्‍न मला पडतो. मराठी वाड्.मय मंडळाचे उद्घाटन करतानाही इंग्रजीत बोलावे लागते, याची आज खरी चिंता आहे. आजच्या पिढीला केशवसुत, मर्ढेकरांसारखे कवी माहीत नाहीत, ही गोष्ट मनाला सतावते. शेणाची जाहिरात श्रीखंड म्हणून केली तरी लोक श्रीखंड समजून शेण खातील इतकी माध्यमे आज प्रभावी झाली आहेत. समाजात आज बुद्धिभेद करणार्‍यांचे आणि चांगल्या शब्दांचा मारा करून चुकीच्या गोष्टी माथी मारणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे.अशावेळी काचेवर सरकणार्‍या मोबाईलच्या शब्दांपेक्षा कागदावरून फिरणारा मजकूर अधिक चांगला आहे, हे कोणीतरी सांगायला हवे. ग्रंथाचे वाचन योग्य वयात तरुणांना करायला लावणे महत्त्वाचे आहे. योग्य वयात पेरले तरच ते भविष्यात उगवेल हेही लक्षात ठेवायला हवे. मातृभाषेवर प्रेम म्हणजे फक्त मराठी भाषेवर प्रेम असा त्याचा अर्थ नाही. मराठीतील शब्दांवरही आपण प्रेम केले पाहिजे. ज्याच्या घरात ग्रंथाचा, साहित्याचा चौरंग नाही त्याच्याघरात भविष्यातील अनेक आव्हाने येणार आहेत. सायकोलॉजिकल आणि अन्य प्रकारचे प्रश्‍नही उभे राहणार आहेत. आज शेतकर्‍यांच्या आत्महत्यां एवढ्याच विद्यार्थ्यांच्याही आत्महत्या क्लेशदायक आहेत. कारण त्यांना आपण कुसुमाग्रजांचा कणा शिकवला नाही. आजच्या विद्यार्थ्यांना कणा आणि कोलंबसचे गर्वगीत शिकवले पाहिजे. या गोष्टी शिकवल्याशिवाय त्यांचे आयुष्य बदलणार नाही, असेही दवणे यांनी सांगितले.
 डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ग्रंथ आणि पुस्तके हे आपले वैभव आहे. ग्रंथच आपले आयुष्य घडवते. आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्यावर ग्रंथच परिणाम करतात. आपण काय व्हायचे हे ग्रंथांमुळेच आपल्याला कळते. समाजात कितीही बदल झाले तरी आजही संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीचे आणि संत तुकारामांच्या गाथांची मोठ्या प्रमाणात पारायणे केली जातात.  आजही संत वाड्.मयाला जनता विसरली नाही. त्यामुळे वाचनाला आपण सर्वांनी महत्त्व दिले पाहिजे. पिपंरी चिंचवडच्या नियोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून अनेकांनी मला अशी विनंती केली, की आपण सातारचा ग्रंथ महोत्सव आवर्जून पहावा आणि खरोखरच येथील चळवळ पाहून मी भारावलो आहे. या संमेलनासारखेच वेगळे ग्रंथदालन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उभारले जाईल.
अमित कदम, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे यावेळी भाषण झाले. प्रारंभी दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविकात  ग्रंथ महोत्सव चळवळीचा आढावा घेतला. सौ. सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वृंदाश्री दाभोलकर यांच्या मोरपीस या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: