Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचे निधन
ऐक्य समूह
Wednesday, August 12, 2015 AT 11:09 AM (IST)
Tags: mn3
संगीत रंगभूमीवरील तारा निखळला
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार, नाट्यतपस्वी भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर यांचे मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मराठी संगीत रंगभूमीवर गाजलेल्या दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्‍वर अशा अनेक नाटकांमध्ये भालचंद्र पेंढारकर यांनी भूमिका केल्या होत्या. विष्णुदास भावे, केशवराव भोसले, बालगंधर्व अशा दिग्गजांचा संगीत रंगभूमीचा वारसा भालचंद्र पेंढाकर यांनी जोपासला होता. मराठी रंगभूमीवरील प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार (1973), बालगंधर्व सुवर्णपदक (1983), केशवराव भोसले पुरस्कार (1990), महेंद्र पुरस्कार (1999), अल्फा जीवनगौरव पुरस्कार (2002), तन्वीर सन्मान पुरस्कार (2005) आणि चतुरंग प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कार (2006), महाराष्ट्र राज्य (पणशीकर) जीवनगौरव पुरस्कार (2008) आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय 2004 साली संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पारितोषिकानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. इस्रायलमध्ये 1996 साली झालेल्या जागतिक मराठी परिषदेतही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
25 नोव्हेंबर 1921 रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे जन्मलेले भालचंद्र पेंढारकर नाट्यवर्तुळात अण्णा या नावाने परिचित होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन, नेपथ्य, छायाचित्रण, नाट्यनिर्मिती या क्षेत्रातही काम केले.
ललित कलादर्श या नाट्यसंस्थेची स्थापनाही त्यांनी केली. भालचंद्र पेंढारकर यांनी प्रख्यात गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. 1942 साली त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. सत्तेचे गुलाम या नाटकात त्यांनी सर्वप्रथम भूमिका  केली होती. पु.भा. भावे लिखित स्वामिनी, बाळ कोल्हटकर यांचे दुरितांचे तिमिर जावो, विद्याधर गोखले लिखित पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर ही नाटके पेंढारकर यांनी आपल्या अभिनयाने आणि समर्थ गायकीने गाजविली होती. आनंदी गोपाळ, रक्त नको मज प्रेम हवे, झाला अनंत हनुमंत ही त्यांची वेगळ्या धाटणीची नाटकेही रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: