Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्राचार्य अरुण माने यांनी शैक्षणिक क्षेत्राला वेगळा विचार दिला : ना. शिंदे
ऐक्य समूह
Monday, December 30, 2013 AT 11:34 AM (IST)
Tags: re3
5रहिमतपूर, दि. 29 : ग्रामीण भागातील मुले शिकावित, स्वत:च्या पायावर उभी रहावीत, त्यांच्यातील क्षमता विकसित व्हाव्यात यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थेत प्राचार्य अरुण माने यांनी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले. अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे माने यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्राला वेगळा विचार देणारे अभ्यासू, व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून मी पाहतो, असे गौरवोद्‌गार पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी काढले.
येथील श्री. चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी व श्री. कोल्हेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, तांदूळवाडी-मंगळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तांदूळवाडी-मंगळापूर येथे प्राचार्य अरुण माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा, स्नेहसंवर्धन, कृतज्ञता व पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार आनंदराव अडसूळ, आ. भगवानराव साळुंखे, भारत विकास ग्रुपचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, सौ. सुनंदा माने, विकास शितोळे, नगराध्यक्षा सौ. शुभांगी बाजारे, माजी नगराध्यक्ष सुनील माने, रवींद्र बेडकिहाळ, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, शिवानंद भारती महाराज, गुलाबसिंग कदम, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे, शिवाजीराव ठोंबरे, प्राचार्य अरुण माने व सौ. सुरेखा माने उपस्थित होत्या.
ना. शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात ज्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था पोहचू शकत नव्हती अशा काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून शाळा-विद्यालये सुरू केली. त्यामुळे ग्रामीण भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. याच विचारांनी पुढे ग्रामीण भागात अनेकांनी छोट्या-मोठ्या संस्था सुरू करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू केले. शिक्षक कधीही सेवानिवृत्त होत नाही. प्राचार्य माने यांनी सेवानिवृत्तीनंतरही संस्थेच्या प्रगतीसाठी, विकासासाठी योगदान द्यावे.
आनंदराव अडसूळ म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. उद्याची भावी पिढी घडावी, समाज घडावा यासाठी प्रा. अरुण माने यांनी प्रत्येक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून योगदान दिले आहे. चांगले काम दीर्घकाळ टिकते. आपल्या कार्यातून माणूस मोठा होतो.
प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, खडतर परिस्थितीत मिळालेले यश मनाला सुखविणारे असते. माणसाने परिसासारखे असावे. इतरांच्या आयुष्याचे सोनं करावे. सामाजिक, सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे काम अरुण माने यांनी केले आहे.
सत्काराला उत्तर देताना, प्राचार्य अरुण माने म्हणाले, आजचा दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे असा स्नेह, मित्र परिवार व संस्था परिवार लाभला हे मी माझे परमभाग्य समजतो. प्राचार्य म्हणून 24 वर्षे सेवा केली. या कालावधीत संस्था, शाळा व विद्यार्थी विकासाचे आणि समाज परिवर्तनाला हातभार लावणारे प्रयोग व उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि योगदानाने यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी डॉ. राजेंद्र शेंडे, हणमंतराव गायकवाड, सौ. सुनंदा माने, सायली गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य अरुण माने यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने मानपत्र प्रदान करण्यात आले. उपशिक्षक पांडूरंग पवार यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते अरुणोदय या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सौ. यास्मिन बागवान, एस.एम. मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, रहिमतपूर, तडवळे, मंगळापूर, तांदूळवाडी येथील ग्रामस्थ, शिक्षक, शाखाप्रमुख, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
 
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: