Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

अमेरिकेची मग्रुरी
vasudeo kulkarni
Wednesday, December 18, 2013 AT 11:13 AM (IST)
Tags: ag1

साऱ्या जगाला मानवता-मानवी हक्कांच्या जपणुकीच्या उपदेशाचे डोस पाजणाऱ्या अमेरिकन सरकारला सुसंस्कृतीची कसलीही चाड नसल्याचे, अमेरिकेतल्या भारतीय उपराजदूत देवयानी खोब्रागडे यांच्याशी तिथल्या पोलिसांनी केलेल्या संतापजनक वर्तनाने चव्हाट्यावर आले आहे. गेल्याच आठवड्यात न्यूयॉर्क शहराच्या भररस्त्यात खोब्रागडे यांना पोलिसांनी खुलेआम बेड्या ठोकून अटक केली होती. आपल्या घरातल्या मोलकरणीला त्यांनी कायद्यानुसार दरमहाचे वेतन दिले नसल्याचा आरोप ठेवून त्यांची ही बेकायदा अटक झाली. आंतरराष्ट्रीय जिनेव्हा करारानुसार राजदूतावासातल्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राजकीय संरक्षण असते. त्यांना कोणत्याही देशाचे सरकार अटक करू शकत नाही. अमेरिकेने मात्र हे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे राजरोसपणे पायदळी तुडवत, भारताच्या परराष्ट्र खात्याशी कसलाही संपर्क न साधताच, देवयानी खोब्रागडे यांना अटक तर केलीच, पण त्यांचा पोलीस ठाण्यात छळ केल्याचेही प्रकरण उघडकीस आले आहे. पोलीस ठाण्यात त्यांना सामान्य कैद्यासारखे बेड्या ठोकून नेण्यात आले. त्यांना व्यसनी आणि गुंड मवाली गुन्हेगारांच्याबरोबर पोलीस कोठडीत डांबले गेले. त्यापेक्षाही अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, त्यांची पोलीस ठाण्यातच अंगझडती घेतली गेली. भारताच्या या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अंगावरचे कपडे उतरवायला लावून तिची तपासणी करणाऱ्या निर्लज्ज आणि बेशरम अमेरिकन प्रशासनाने त्या घटनेचेही समर्थन करावे, ही अत्यंत गंभीर बाब होय! अमेरिका जगातली महासत्ता असली, तरी आंतरराष्ट्रीय कायदे मोडायचा, आपल्याला हवी तशी बेमुर्वतखोर वर्तणूक करायचा अधिकार असल्याची अमेरिकेची ही मस्ती जगाने आणि विशेषत: भारतानेही मुळीच खपवून घेता कामा नये. मुळातच देवयानी खोब्रागडे यांना झालेली अटक पूर्णपणे बेकायदा आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असतानाही, अमेरिकन प्रशासनाने त्या किळसवाण्या कृत्याबद्दल त्यांची आणि भारत सरकारची माफी मागितलेली नाही. अमेरिकेच्या भारतातल्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांना परराष्ट्र खात्याने बोलावून घेऊन देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेचा जाब विचारल्यावरही, अमेरिकन प्रशासनाने या प्रकरणी आपली चूक कबूल केलेली नाही. खोब्रागडे यांची पोलीस ठाण्यात घेतलेली अंगझडती ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच असल्याचा अमेरिकन परराष्ट्र खात्याचा खुलासा, म्हणजे माजुर्डेपणाचा कळस होय. आमच्या नागरिकांना आणि परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना जगातल्या सर्व देशात सन्मानाची वागणूक मिळायला हवी. त्यांच्या गंभीर गुन्ह्याबद्दलही संबंधित देशांनी कारवाई करता कामा नये, असे अमेरिकेचे धोरण आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातल्या अमेरिकन दूतावासातल्या अधिकाऱ्याला एका खुनाच्या प्रकरणात, तिथल्या पोलिसांनी अटक केली, तेव्हा अमेरिकेने केवढे आकांडतांडव केले होते. खुनाच्या गुन्ह्यासाठीही अमेरिकन अधिकाऱ्याला अटक करायचा अधिकार पाकिस्तान सरकारला नाही, असे अमेरिकन सरकार तेव्हा सांगत होते. अमेरिकन सरकारने दबाव आणून शेवटी त्या खूनी अमेरिकन अधिकाऱ्याला अमेरिकेत पाठवणे पाकिस्तान सरकारला भाग पाडले होते. आता मात्र हेच अमेरिकन सरकार देवयानी खोब्रागडे यांच्याशी तिथल्या पोलिसांनी केलेल्या अशिष्ट, असंस्कृत वर्तनाचे समर्थन करते आहे. अमेरिकेला आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांची काहीही चाड नाही. सत्तेच्या मस्तीत जगावर दादागिरी करायला सोकावलेल्या अमेरिकेच्या नांग्या केंद्र सरकारने ठेचायलाच हव्यात, अन्यथा भारतीय महिलांची अशी बेअब्रू करणाऱ्या अमेरिकन सरकारला अधिकच मोकाट रान मिळेल!
हा तर मवालीपणा!
भारतीय परराष्ट्र सेवेत उच्चाधिकारी असलेल्या देवयानी खोब्रागडे यांनी न्यूयॉर्कमध्ये आपल्या घरी काम करायसाठी भारतातून संगीता रिचर्ड यांना मोलकरीण म्हणून नेले होते. दरवर्षाला तीस हजार डॉलर्स पगार द्यायचा करारही खोब्रागडे यांनी संगीताशी केला होता. जून 2012 ते डिसेंबर 2012 अखेर संगीता खोब्रागडे यांच्या घरी काम करीत होती. पण तिने दरमहा दहा हजार डॉलर्स वेतन मिळावे, अशी मागणी केली. ती मान्य करायची कुवतच नसल्यामुळे त्या संगीताच्या दबावापुढे झुकल्या नाहीत. गेल्यावर्षी संगीता ही देवयानी खोब्रागडे यांना न सांगताच घरातून निघून गेली. देवयानी खोब्रागडे यांनी पोलिसात आपली मोलकरीण बेपत्ता झाल्याची आणि तिने आपली फसवणूक केेल्याची तक्रारही दाखल केली. त्या तक्रारीचा तपास करायच्याऐवजी संगीताच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, न्यूयॉर्क पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांच्यावरच गंभीर आरोप ठेवले आहेत. मेनहटनमधले भारतीय वंशाचे सरकारी वकील प्रीत भरारा यांनी त्यांच्यावर अठरा पानी आरोपपत्र ठेवून पोलिसांना अटक करायला लावली. न्यूयॉर्कच्या न्यायालयाने देवयानी खोब्रागडे यांची अडीच लाख डॉलर्सच्या जामिनावर मुक्तता केली असली, तरी त्यांच्यावर खटला चालवायची प्रक्रिया अमेरिकन सरकारने सुरू केली आहे. देवयानी खोब्रागडे यांना अटक होताच, भारतीय परराष्ट्र खात्याने तीव्र आक्षेप घेऊन, भारतातल्या अमेरिकन राजदूताला समज देवूनही, काही उपयोग झालेला नाही. आता पोलीस ठाण्यात देवयानी खोब्रागडे यांना गुंड मवाल्यासारखी वागणूक देणारे अमेरिकन पोलीस आणि अमेरिकन सरकार मवालीपणानेच वागत असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकन कायद्यानुसार घरातल्या मोलकरणीला दरमहा साडे चार हजार डॉलर्स पगार द्यायला हवा, असे त्या सरकारचे म्हणणे आहे. पण प्रत्यक्षात खुद्द देवयानी खोब्रागडे यांनाच दरमहा चार हजार एकशेवीस डॉलर्स पगार मिळत असताना, आपल्यापेक्षा जास्त पगार त्या मोलकरणीला कोठून देणार याचा विचार मात्र अमेरिकन पोलिसांनी आणि कायदा खात्यातल्या वरिष्ठ वकिलांनी केलेला नाही. मालकालाच कमी पगार असल्यास, नोकराला त्यापेक्षा अधिक पगार कसा देता येईल, याचा विचार अमेरिकन पोलीस करायला तयार नाहीत. देवयानी खोब्रागडे यांना अवमानास्पद, रानटी, क्रूर वागणूक देणारे अमेरिकन पोलीस आपल्याच देशातल्या कायद्यावर बोट ठेवून उद्दामपणे वागत आहेत आणि त्यांना अमेरिकन सरकारने चाप लावलेला नाही. तो लावायची त्यांची तयारीही नसल्याचे या घटनेनंतर उघडही झाले आहे. पारपत्र आणि परवाना द्यायचा अधिकार भारत सरकारचा असताना, अमेरिकन सरकार हा अधिकार आपला असल्याचा दावा करते आहे. हा खटला अमेरिकन न्यायालयात चालल्यास आणि देवयानी खोब्रागडे दोषी ठरल्यास त्यांना दहा ते पंधरा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. केंद्र सरकारने या प्रकरणाची अतिगंभीर दखल घेतली, हे योग्य झाले. देवयानी खोब्रागडे यांची पोलीस ठाण्यात अंगझडती घेतल्याचे समजताच, लोकसभेच्या सभापती मीरा कुमार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कॉंग्रेस चे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी भारतात आलेल्या अमेरिकन कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घ्यायला नकार देवून, या प्रकरणात केंद्र सरकार आक्रमक असल्याचे दाखवून दिले आहे. अमेरिकेच्या मुजोरीला फक्त निषेध खलित्याने नव्हे, तर कृतीनेच उत्तर द्यायला हवे.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: