Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चांगले गुरू व माणसे भेटल्यामुळेच नावलौकिक मिळवू शकलो : कदम
ऐक्य समूह
Monday, November 11, 2013 AT 11:26 AM (IST)
Tags: re6
रहिमतपूर, दि. 10 : जीवनाच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर चांगले गुरू व माणसे भेटली. माझ्यातील कमीपणाची वेळोवेळी जाणीव करून देत योग्य दिशा दिली म्हणून मी कवी, अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवू शकलो, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी केले.
येथे आयोजित रहिमतपूर महोत्सव 2013 च्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्कृती प्रकाशन, पुणेच्या सौ. सुनीताराजे पवार, अभिनेत्री अमृता सुभाष, महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक व माजी नगराध्यक्ष सुनील माने, महोत्सव समितीचे अध्यक्ष वासुदेव माने, उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, नगराध्यक्षा सौ. शुभांगी बाजारे,उपनगराध्यक्ष विक्रमसिंह माने, प्रा. भानुदास भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कदम म्हणाले, रहिमतपूर नगरीला ऐतिहासिक, साहित्यिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. कवी गिरीश, नाटककार वसंत कानेटकर, साहित्यिक गो. पु. देशपांडे, अभिनेत्री ज्योती सुभाष, अमृता सुभाष, बेला शेंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी या नगरीचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आहे. अशा महोत्सवातून बालमनावर संस्कार होऊन सक्षम समाजाची निर्मिती होते. यासाठी रहिमतपूरकरांना या मातीचा व जीवन समृद्ध करणाऱ्या या महोत्सवाचा अभिमान असला पाहिजे.
आपला प्रवास कथन करताना ते म्हणाले, माझे बालपण खेड्यात गेले. आई-वडिलांचे, गुरुजनांचे उत्तम संस्कार झाले. शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी झालो. पुढे स्वत:चा मार्ग स्वत: शोधला आणि जीवनाचा प्रवास सुसह्य झाला. रसिक श्रोत्यांनी टी. व्ही. वरील मालिका, जोगवा, नटरंग या चित्रपटातील भूमिकांना भरभरून दाद दिली. आपल्या कवितांच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भात ते म्हणाले, प्रत्येक घरात आई वातीसारखी जळत राहते. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलत असते. त्यामुळे माझ्याही भावना आईशी गुंतलेल्या आहेत. या भावना माझ्या कवितेत सहजपणे शब्दबद्ध झाल्या आहेत. संगणक युग आल्याने व जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. पण नवे स्वीकारताना जुनेही जपले पाहिजे. जुन्या नव्याच्या संगमातूनच प्रत्येकाचे आयुष्य समृद्ध व सुंदर होईल. ङ्गउन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हावयाचे, ऋतूंना ऋतूने जरा भागले, की नव्याने जुने झाड उगवायचेङ्ख, अवघड गणित जगण्याचे सोपे करते आई, कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही, अशा कविता सादर करून रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.
अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाल्या, या गावात माझे बालपण गेले, संस्कार झाले. या मातीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने आज बालपणाच्या अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. यावेळी त्यांनी काव्यपंक्तींचा आधार घेत माणसांबरोबरच मातीविषयी असणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
यावेळी सुनीताराजे पवार यांचे भाषण झाले. मान्यवरांच्या हस्ते रहिमतपूर मुद्रा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. समितीचे अध्यक्ष वासुदेव माने यांनी प्रास्ताविक केले. सुनील माने व प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी स्वागत केले. गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. विकास पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास आनंदा कोरे, किसनराव राऊत, अविनाश माने, दीपक नाईक, सौ. सुषमा कोल्हे, विद्याधर बाजारे, शशिकांत भोसले, संभाजी माने-पाटील, मधुसूदन मोहिते, नंदकुमारमाने-पाटील, अरुण माने, डॉ. दिलीप देशपांडे, बी. व्ही. जी. कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, डॉ. मिलिंद शहा, डॉ. विजय झोरे, डॉ. विक्रम भोसले, सुखदेव माने यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला, युवक व युवती उपस्थित होत्या.
 
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: