Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दिग्गज गायकांच्या शब्दसुरांच्या गट्टीने रसिक झाले चिंब चिंब!
ऐक्य समूह
Saturday, October 26, 2013 AT 11:12 AM (IST)
Tags: re8
औंध, दि. 25 : येथील श्री यमाई देवीच्या पायथ्याशी असलेल्या कला मंदिरात सकाळच्या प्रहरी तालासुरांची गट्टी जमली आणि दिग्गज गायकांच्या शब्दसुरांनी उपस्थित रसिकांना अगदी चिंब चिंब करून टाकले.
73 व्या शिवानंदस्वामी संगीत महोत्सवास येथे मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. सकाळपासूनच रसिकांमध्ये सळसळता उत्साह दिसून येत होता.  सकाळच्या सत्रात आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाने सकाळच्या सत्राची सुरुवात झाली. सोनेरी किरणांच्या साक्षीने सप्तसुरांच्या उधळणीने दमदार सादरीकरण करून नव्या दमाच्या कलाकार आरती कुंडलकर यांनी अल्पावधीत बैठकीवर जम बसवला. त्यांनी राग परमेश्वरी सादर केला. त्यानंतर संत नामदेवांचे भजन सादर केले. शिवानंदस्वामी संगीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर जोशी उर्फ बच्चूभाई यांच्या कन्या व पं. गजानन बुवा जोशी यांची नात पल्लवी जोशी व अपूर्वा गोखले यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. या संगीत महोत्सवाची नव्याने जबाबदारी स्वीकारलेल्या तिसऱ्या पिढीतील दोघी बहिणींनी आपल्या घराण्याचा संगीताचा वारसा समर्थपणे पेलत असल्याचे त्यांच्या गायनातून सिद्ध केले. पुण्याचा सवाई बालगंधर्व संगीत महोत्सव गाजवणाऱ्या दोघी भगिनींनी आजवरच्या कार्यक्रमात देखील कुठलीच कसर ठेवली नाही. दोघीही संगीत क्षेत्रातील नामवंत पुरस्काराच्या मानकरी आहेत. त्यांनी राग बिभास व राग जौनपुरी पेश केला. त्यांच्या जुगल गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. पं. गजानन बुवा जोशी यांचा वारसा पुढील पिढीत देखील उतरल्याचा विश्वास या कार्यक्रमामुळे रसिकांना झाला. त्यानंतर तानसेन महोत्सव गाजवणाऱ्या व शास्त्रीय संगीतातील चारही मुख्य घराण्याच्या गायकीची तालीम लाभलेल्या शुभदा पराडकर यांनी कोमल रिषभ आसावरीच्या गायनाने भर दुपारच्या वेळी रसिकांना स्वरांची शीतलता दिली. तबल्यावर प्रवीण करकरे, स्वप्नील भिसे, हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, चैतन्य कुंटे यांनी साथ केली.
चारच्या सत्रात रियाझ स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ कलाकार देवदत्त सोहनी उर्फ बंडोपंत यांच्या हस्ते व संगीत साधना, सांगलीचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चैतन्य, डॉ. सुचेता बिडकर, प्रसाद कुलकर्णी, पल्लवी जोशी, अपूर्वा गोखले, सुनील पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुचेता बिडकर यांच्या संगीतशास्त्र भाग 2 या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
दरम्यान, या महोत्सवाची सुरुवात आ. प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी खटाव पंचायत समितीच्या सभापती सोनाली खैरमोडे, अरुण कशाळकर, उपसरपंच इलियास पटवेकरी, शंकरराव खैरमोडे, प्रदीप कणसे, मालूताई बीडकर, स्टेट बॅंकेचे शाखाधिकारी अरुण घार्गे, प्रशांत खैरमोडे, वसंतराव गोसावी, राजेंद्र गुरव, डॉ. संजय यादव, हेमंत हिंगे आदी उपस्थित होते. यावेळी आ. घार्गे यांचे भाषण झाले. स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठानचे विश्वस्त सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या सुकन्या पल्लवी जोशी व अपूर्वा गोखले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

 
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: