Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन
ऐक्य समूह
Tuesday, October 01, 2013 AT 10:58 AM (IST)
Tags: mn3

मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज मुंबईत निधन झाले. पाटील यांनी भगवती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पाटील यांच्या "जोगवा' व "पांगिरा' या दोन मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. पाटील यांनी आपल्या चित्रपटांमधून सामाजिक विषय हाताळले होते. नुकताच त्यांचा "72 मैल : एक प्रवास' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता अक्षयकुमारची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट होता. हा चित्रपटही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. पाटील यांनी "सावरखेड एक गाव', "सनई चौघडे', "ऑक्सिजन', "ब्लाईंड गेम' या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.  
राजीव पाटील यांनी नुकताच दिग्दर्शित केलेला "वंशवेल' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तो सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. "वंशवेल'च्या माध्यमातून एकाच चित्रपटात अठरा कलाकार एकत्र आणण्याचा अनोखा प्रयोग पाटील यांनी केला. मूळचे नाशिकचे असलेले पाटील हे इंजिनिअर होते. त्यांनी अतुल पेठे यांच्यासमवेत हौशी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ते मराठी चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईत आले. त्यांनी अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी अशा दिग्गज दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून काम केले होते. जोगवा व पांगिरा या चित्रपटांच्या कसबी दिग्दर्शनामुळे ते प्रकाशझोतात आले. "72 मैल : एक प्रवास' या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण साताऱ्यानजीकच्या परिसरात झाले होते.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: