Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाऊ फक्कड यांना प्रकाशात आणण्याचे काम डॉ. अहिवळे यांनी केले : मधु कांबीकर
ऐक्य समूह
Friday, May 03, 2013 AT 11:15 AM (IST)
Tags: re8
पाटण, दि. 2 : भाऊ फक्कड हे तमाशातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी नायकापासून खलनायकापर्यंत आणि स्वत: नाच करण्यापासून ते अनेक वाद्यं वाजविण्यापर्यंत त्यांचा हातखंडा होता. त्यांची बुध्दी अलौकिक होती. मात्र, नशिबाने त्यांना उपेक्षित आणि अंधारात रहावे लागले ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांना प्रकाशात आणण्याचे कार्य प्रा. डॉ. पांडुरंग अहिवळे यांनी केले ही अभिनंदनिय बाब आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेत्री मधु कांबीकर यांनी केले.
साहित्य कला विकास प्रतिष्ठान सातारा यांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रसिध्द साहित्यिक प्रा. व. वा. बोधे होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. डी. व्ही. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. व. वा. बोधे म्हणाले, साक्षात पट्टेबापूरावसारख्या नामवंत सवाल जवाबात हरवणारा अत्यंत ज्ञानी शाहीर म्हणून शाहीर भाऊ फक्कड यांचे नाव इतिहासात आजरामर झाले आहे. या शाहीराने लिहिलेल्या लावण्या, गण गवळणी वाचल्यानंतर आणि त्यांचा अभिनय, संवादफेक पाहिल्यानंतर या शाहिराची उंची लक्षात येते.
डॉ. डी. व्ही. देशपांडे म्हणाले, शाहीर भाऊ फक्कड हे माझ्या पाटण तालुक्यातील हुंबरणे या गावचे होते. चळवळीतील कार्यकर्ते असल्याने त्यांचे आमच्या वडीलांकडे येणेजाणे होते. माझ्या तालुक्यात जन्माला आलेला हा शाहीर डॉ. ऐवळे यांनी पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित आणला. आता या पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र या शाहीराला स्वत:च्या डोक्यावर घेईल. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. ऐवळे यांच्या शाहिरांचे शाहीर भाऊ फक्कड गं्रथाचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. ऐवळे, संभाजीराव पाटणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
 
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: