Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
"जालियनवाला हत्याकांड' इंग्लंडला लाजिरवाणे
vasudeo kulkarni
Thursday, February 21, 2013 AT 11:58 AM (IST)
Tags: na1
अमृतसर, दि. 20 (वृत्तसंस्था) : भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात स्वात्रंत्र्यासाठी चळवळीने जोर धरला असताना ब्रिगेडियर जनरल डायरच्या आदेशावरुन ब्रिटिश सैनिकांनी जालियनवाला बागेत केलेले निर्घृण सामूहिक हत्याकांड ही इंग्लंडसाठी सर्वात लाजिरवाणी बाब आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी स्पष्ट केले. भारत दौऱ्यावर आलेल्या कॅमेरुन यांनी अमृतसर येथे जालियनवाला बाग स्मारकाला भेट देऊन मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. मात्र जालियनवाला हत्याकांड लाजिरवाणे असल्याचे सांगताना माफीचा चकार शब्दही उच्चारला नाही.
जालियनवाला बागेतील अभ्यागतांसाठीच्या वहीमध्ये कॅमेरुन यांनी आपला संदेश नोंदवला. "ब्रिटिशांच्या इतिहासातील ही सर्वात लाजिरवाणी घटना होती. तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनीही या घटनेचे घृणास्पद म्हणून केलेले वर्णन सुयोग्य आहे. या बागेत जे घडले ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्या घटनेची आठवण म्हणून ब्रिटन कायमच जगात शांततापूर्ण निदर्शनांच्या हक्काच्या बाजूने उभा राहील, असे कॅमेरुन यांनी या संदेशात म्हटले आहे. (या संदेशातील "कधीच' या शब्दाखाली त्यांनी रेघ (अंडरलाईन) ओढली आहे.  जालियानवालासारख्या घटना विसरुन ब्रिटनने शांततेसाठी काम केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे. आतापर्यंत जगातील अनेक देशांनी आपल्या लष्कराने दुसऱ्या देशात केलेल्या सामूहिक हत्याकांडांसाठी जाहीर माफी मागितली आहे. अमेरिकेनेही हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्याबद्दल जपानची माफी मागितली. मात्र ब्रिटनने जालियनवाला हत्याकांडासाठी अद्याप भारताची माफी मागितलेली नाही. त्यामुळे कॅमेरुन यांच्या वक्तव्यामागे भारतीयांना खुश करण्याचा उद्देश असल्याची शक्यता आहे. त्यांच्या देशात सध्या आर्थिक मंदी असून भारतीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि भारतातही गुंतवणूक करुन आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न कॅमेरुन करत आहेत. सध्या संपूर्ण युरोपात मंदीचे वातावरण आहे. या मंदीतून सावरण्यासाठी अनेक युरोपीय देश भारत व चीन या दोन बलाढ्य आशियाई देशांच्या बाजारपेठेकडे अपेक्षेने पहात आहे. भारतावर ब्रिटिशांचा अंमल असताना 13 एप्रिल 1949 रोजी ब्रिगेडिअर जनरल डायरच्या आदेशावरुन ब्रिटिश सैनिकांनी जालियान बागेत असलेले एकमेव प्रवेशद्वार बंद करुन बैसाखीसाठी जमलेल्या निःशस्त्र भारतीयांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये शेकडो निरपराध ठार झाले होते. त्यामध्ये मुले, महिला व वृध्दांचा समावेश होता. या हत्याकांडाचा चर्चिल यांनी "राक्षसी' कृत्य अशा शब्दात निषेध केला होता. मात्र ब्रिटिश सरकारने डायरचा गौरव करुन भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले होते.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: