Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठी मनोरंजन क्षेत्रातील "अक्षय-आनंद' हरपला
ऐक्य समूह
Tuesday, December 25, 2012 AT 10:59 AM (IST)
Tags: mn1

अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचे अपघाती निधन; मराठी नाट्यसृष्टीवर शोककळापुणे, दि. 24 : मराठी मालिका, चित्रपट आणि मराठी रंगभूमीवरील नामवंत कलाकार आनंद अभ्यंकर (वय 50) आणि अक्षय पेंडसे (वय 33) यांचे रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. उर्से टोलनाक्याजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली. अभ्यंकर यांच्या मारुती वॅगनआर या कारला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने हा अपघारत घडला. यामध्ये पेंडसे यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष याचाही दुर्दैवी अंत झाला. पेंडसे यांची पत्नी दीप्ती आणि कारचालक सुरेश पाटील हे किरकोळ जखमी झाले. "कोकणस्थ' या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर हे सर्वजण पुण्याहून मुंबईकडे जात होते. या दुर्घटनेमुळे मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अभ्यंकर व पेंडसे यांच्यासमवेत काम करणाऱ्या अनेक कलावंतांना या घटनेमुळे धक्का बसला असून अनेकांना अश्रू अनावर झाले. मराठी मनोरंजन क्षेत्रातील "अक्षय-आनंद' हरपला, अशी भावना कलावंतांनी व्यक्त केली.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्याच्या पुढे मुंबईच्या दिशेला काही किलोमीटर अंतरावर (कि. मी. 74 जवळ) रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास आनंद अभ्यंकर यांच्या कारला एक टेम्पो भरधाव वेगात येऊन धडकल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते आनंद अभ्यंकर (वय 50) व अक्षय पेंडसे (वय 33) हे पुण्यात "कोकणस्थ' आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले होते. चित्रीकरण आटोपून ते रात्री 10.15 च्या सुमारास मुंबईकडे निघाले. यावेळी आनंद अभ्यंकर यांच्यासमवेत वॅगनार कार (क्र. एमएच-02-सीव्ही-3405) मधून अक्षय पेंडसे, त्यांची पत्नी दिप्ती (वय 30) व मुलगा प्रत्युष (वय 2) हे मुंबईला निघाले होते. कारचालक सुरेश पाटील (वय 30) हाही त्यांच्यासमवेत होता. अपघात घडला तेव्हा स्वत: आनंद अभ्यंकर कार चालवीत असल्याची माहिती मिळाली आहे. उर्से टोलनाक्याच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर आल्यावर विरुध्द बाजूच्या पुणे लेनवरील टेम्पो (क्र. एमएच-14-सीपी-0228) हा भरधाव वेगाने रस्ता दुभाजक तोडून आणि दोन लेनमध्ये असलेला छोटेखानी बगीचा ओलांडून अचानक पुणे-मुंबई लेनवर आला. यावेळी तिसऱ्या लेनवरुन चाललेल्या अभ्यंकर यांच्या कारला जोरदार धडक देवून टेम्पो रस्त्याच्या खाली गेला.
कारला बसलेली धडक एवढी जोरदार होती की, त्यामध्ये चालकाच्या सीटवर बसलेले आनंद अभ्यंकर, त्यांच्या मागच्या सीटवर बसलेले अक्षय पेंडसे व त्यांच्या बाजूला बसलेला त्यांचा मुलगा प्रत्युष हे गंभीररित्या जखमी झाले. दीप्ती पेंडसे व सुरेश पाटील हे किरकोळ जखमी झाले. आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत सर्व जखमींना निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलकडे रवाना केले. मात्र तोपर्यंत अभ्यंकर व पेंडसे पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता. अभ्यंकर यांच्या डोक्याला व छातीला गंभीर जखमा झाल्या होत्या तर पेंडसे यांना अनेक ठिकाणी जखमा होऊन त्यांचा उजवा हात तुटला होता. प्रत्युष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी सकाळी दहा वाजता पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनानंतर केल्यानंतर तिघांचे मृतदेह अभिनेते अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी यांनी ताब्यात घेतले. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आनंद यांच्या निधनाने मराठी चित्रपट, मालिका व नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मातीच्या चुली, आनंदाचे झाड, आयडियाची कल्पना, जिस देश मे गंगा रहेता है, वास्तव, बालगंधर्व, चेकमेट, तेरा मेरा सात, स्पंदन, अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटातील आणि असंभव, तारक मेहता का उलटा चष्मा या टीव्ही मालिकां-मधील त्यांच्या विविधढंगी भूमिका रसिकांच्या मनामध्ये तरळतात. सध्या त्यांची "झी मराठी' वाहिनीवरील "मला सासू हवी' या मालिकेतील त्यांची भूमिका अत्यंत लोकप्रिय झाले आहे. याच मालिकेत अक्षय पेंडसे हे त्यांच्या मुलाची भूमिका करत होते.
अभिनेते सुधीर जोशी यांच्या आकस्मिक निधनानंतर ते करत असलेल्या "मातीच्या चुली' या चित्रपटातील त्यांची अर्धवट राहिलेली भूमिका अभ्यंकर यांनी पूर्ण केली होती. "फू बाई फू'मधील विनोदी भूमिकेने तर त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. अक्षय पेंडसे यांनी "उत्तरायण' या मराठी चित्रपटात शिवाजी साटम यांच्या मुलाची भूमिका केली होती. पेंडसे यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर उद्‌घोषक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. अतुल परचुरे यांच्यासमवेत "मि. नामदेव म्हणे' "खरं सांगायचं म्हणजे' या लोकप्रिय नाटकांमधील पेंडसे यांच्या भूमिका गाजल्या होत्या. सध्या ते अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका करत होते. पेंडसे यांची कारकीर्द नुकतीच कुठे बहरत होती. अशावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने मराठी रसिक सुन्न झाले आहेत. पेंडसे यांची पत्नी दिप्ती यांच्यावर ओढवलेल्या या भयानक प्रसंगाने अनेकांच्या  डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.
आनंद अभ्यंकर यांच्यासमवेत अनेक वर्षे काम करणाऱ्या अभिनेत्री आसावरी जोशी यांना आपल्या भावना व्यक्त करणे जड जात होते. अनेक मराठी कलावंतांचीही तीच अवस्था होती.
अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री लालन सारंग, डॉ. मोहन आगाशे, शरद पोंक्षे, भार्गवी चिरमुले, सुबोध भावे, श्रीरंग गोडबोले, गिरीश ओक, सी. ताम्हणकर, उदय सबनीस, अशोक शिंदे, मृण्मयी देशपांडे, संदीप खरे, उमेश कामात, आसावरी जोशी, पुष्कर क्षोत्री आदी मराठी अभिनेते व अभिनेत्री यावेळी उपस्थित होत्या.
पुणे येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अभ्यंकर व पेंडसे यांच्या पार्थिवांवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत अंकुश चौधरी, सुनील बर्वे, प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ, प्रसाद ओक, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, हर्षदा खानविलकर व अनेक मान्यवर सहभागी झाले होते. आपल्या लाडक्या कलावंतांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी असंख्य चाहते व मनोरंजन क्षेत्रातील कलावंत, मान्यवरांनी पुणे येथे धाव घेतली होती.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: