Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

जनसामान्यांचा पुढारी
ऐक्य समूह
Thursday, September 27, 2012 AT 01:23 AM (IST)
Tags: lolak
गेेल्या काही वर्षात "पुढारी' हा शब्द स्वार्थी-संधिसाधू राजकारण्यांच्यामुळे बदनाम झाला. पण बाबा कुपेकर मात्र याला अपवाद होते. ते सर्वार्थाने जनसामान्यांचे पुढारी होते. सामान्य जनतेनेच त्यांना पुढारीपण दिले आणि ते पुढारीपण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत टिकवलेही! कृष्णराव रखमाजीराव देसाई हे त्यांचे मूळ नाव. पण बाबा कुपेकर याच नावाने ते सर्व परिचित आणि लोकप्रिय होते. गडहिंग्लज तालुक्यातल्या कानडेवाडी गावच्या सरपंचपदापासून ते जिल्हा परिषदेचे कृषी, सहकार खात्याचे सभापती, आमदार, सहकार मंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने फुलत गेली. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवही झाला. जिल्हा परिषदेचे सभापतिपद गेले. विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी तब्बल बारा वर्षे त्यांनी सांभाळली. सत्ता असो वा नसो, बाबा मात्र सर्वसामान्यांचे सदैव बाबाच राहिले. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचे रहस्य, लोकसंग्रह आणि सर्वसामान्यांच्या सुख-दु:खाशी जुळलेली नाळ हेच होते. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षे त्यांनी अत्यंत उत्कृष्ट आणि नि:पक्षपातीपणे सांभाळले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानसभेवर निवड झालेली असतानाही, अध्यक्षपदाच्या आसनावर असताना त्यांनी रामशास्त्री बाण्याची भूमिका सदैव बजावली. सत्ताधाऱ्यांनाही त्यांचा दरारा वाटत असे. जनतेच्या प्रश्नावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारला धारेवर धरल्याच्या अनेक प्रसंगात, मंत्र्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत, तर ते त्यांनाही तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, योग्य उत्तरे द्या. जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारायचा उद्योग करू नका, अशा शब्दात मंत्र्यांनाही ते रोखठोकपणे बजावत असत. त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदाची कारकीर्द गाजली, ती त्यांच्या सभागृह चालवायच्या विलक्षण हतोटीने आणि हजरजबाबीपणाने. सरकारवर वचक कायम ठेवल्यानेच! देशातील विधानसभेचे उत्कृष्ट अध्यक्ष असा त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानही झाला होता. 2009 मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर गडलिंग्लज मतदार संघातून चौथ्यांदा विजयी झालेले बाबा पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष होतील, ही अपेक्षा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या श्रेष्ठांच्यामुळे फोल ठरली. खुद्द बाबाही या अन्यायाने नाराज झाले. महाराष्ट्राच्या नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले. पण या मंडळावर नाराज झालेले बाबा आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवू शकले नाहीत.
1966 ते 1969 या काळात ते कानडीवाडीचे सरपंच होते. त्याच काळात कोल्हापूरच्या कीर्ती महाविद्यालयाचे सरचिटणीसही होते. युवक जिल्हा कॉंग्रेसचे ते याच काळात अध्यक्ष झाले आणि त्यांचा राजकीय प्रवास जीवनाच्या अखेरच्या क्षणी थांबला. 1967 ते 87 अशी सलग वीस वर्षे ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 1966 ते 72 या काळात कृषी आणि सहकार खात्याचे सभापती असताना, 1971 च्या भीषण दुष्काळात त्यांनी सारा कोल्हापूर जिल्हा रात्रंदिवस फिरून पालथा घातला. पाझर तलावासह दुष्काळात उत्पादक कामांचा आग्रह धरला. त्या दुष्काळी वर्षातच फक्त त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश गावातल्या तलावांचा गाळ दुष्काळी कामातून काढला गेला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याची त्यांनी केलेली फेररचना आदर्श ठरली. साऱ्या राज्यभर तिची अमलबजावणीही झाली. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांचा त्या कार्याबद्दल गौरवही केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या काळम्मावाडी, चांदोली, गेळवडे, घटप्रभा यासह सर्व नद्यांवरच्या धरणांना सरकारने मंजुरी द्यावी यासाठी बाबांनी कोल्हापूर जिल्हा धरण परिषदेची स्थापना करून, शेतकऱ्यांचे अनेक मेळावे घेतले. आपल्याच सरकारविरुध्द मोर्चे काढले. आंदोलने केली. धरणग्रस्तांच्या समस्यांसाठी लढे दिले. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नद्यांवरची मोठी धरणे बांधून पूर्णही झाली, हे त्यांचे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवरचे ऋण आहे. शेतकरी आणि शेतीच्या समस्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठी ते जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत झुंजत राहिले. सहकार मंत्री असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी तडजोड केली नाही. फर्डे वक्ते असलेल्या बाबांना वाचनाचा अफाट छंद होता. ते उत्कृष्ट शेतकरीही होते. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक नेसरीच्या पवित्र खिंडीत त्यांनी उभारायसाठी प्रयत्न केले आणि ते पूर्णही झाले. वयाच्या सत्तराव्या वर्षी कर्करोगाने गाठल्याने त्यांचे निधन झाले. या सर्वार्थाने लोकप्रिय आणि जनतेशी एकरूप झालेला लोकांचा "पुढारी' हरपला आहे.
- वासुदेव कुलकर्णी
© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: