Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचा मोर्चा
ऐक्य समूह
Wednesday, April 04, 2012 AT 01:52 AM (IST)
Tags: news


 
युतीच्या आमदार निलंबनाच्या निषेधार्थ

महाबळेश्वर, दि. 3 ः युतीच्या 14 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केल्याच्या निषेधार्थ आघाडी शासनाचा धिक्कार म्हणून महाबळेश्वर तालुका व शहर शिवसेनेने मंगळवारी शहरातून मोर्चा काढून निलंबनाची कारवाई मागे घेण्याबाबतचे निवेदन तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना दिले. हा मोर्चा शिवसेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ सपकाळ, यशवंत घाडगे, तालुका प्रमुख राजेश कुंभारदरे, महाबळेश्वर अर्बन बॅंकेचे चेअरमन, शहर प्रमुख विजय नायडू, धोंडीबा धनावडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
हा मोर्चा येथील शिवाजी चौकातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व भवानी मातेस वंदन करुन निघाला. युती आमदारांच्या निलंबनाबाबत शासनाच्या धिक्काराच्या घोषणा देत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा जयजयकार करीत शहरातून येथील तहसील कार्यालयावर गेला. तेथे महाबळेश्वरचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन त्वरित वरिष्ठांकडे पुढील कारवाईसाठी पाठवितो असे आश्वासन तहसीलदार चव्हाण यांनी दिल्यावर मोर्चाची सांगता झाली. यावेळी महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक एन. बी. कोहिनकर, शिवसेना विभागप्रमुख भिवराम मोरे, उपप्रमुख प्रशांत मोरे, कोयना विभाग प्रमुख संजय मोरे, प्रवीण कदम, चंद्रकांत पांचाळ, शंकर ढेबे आदी उपस्थित होते. मोर्चात तालुक्यासह शहरातील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो गॅलरी

© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: