
फलटण, दि. 5 : श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेबानंतर तालुक्याच्या विकासाची दृष्टी असलेले खंबीर नेतृत्व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या रुपाने तालुक्याला लाभल्याने गेल्या 20 वर्षात तालुक्याचा विकास मार्गी लागला आहे. विरोधकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आपल्यावर टीका करण्याशिवाय काम शिल्लक राहिले नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात तालुक्यात विविध ठिकाणी सभा, बैठकांमध्ये ते बोलत होते. त्यांच्या सभांना सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिंती, विडणी, बरड, गोखळी, गुणवरे येथे त्यांच्या सभा झाल्या.
शेती, औद्योगिक विकास गतिमान
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेबांनी वीर धरणाच्या माध्यमातून तालुक्यात आणलेल्या पाटाच्या पाण्याद्वारे एक तृतीयांश भाग बागायती झाला. त्यांच्याच प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या साखरवाडी व श्रीराम कारखान्यांमुळे तालुक्यात औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला. त्यानंतर गेल्या काही वर्षात ना. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उर्वरित दोन तृतीयांश भागातील शेतीला पाटाचे पाणी देण्यासाठी नीरा-देवघर व धोम-बलकवडी धरणांच्या कामांना गती देण्यात आली. नीरा-देवघर हे साडेअकरा टीएमसीचे धरण पूर्ण झाले असून त्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून पाणीसाठा होत आहे. या धरणाच्या कालव्याची कामे वेगात सुरू असून धरणाचे पाणी आगामी काळात तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात पोहोचणार आहे. धोम-बलकवडी या चार टीएमसी धरणाचे पाणी पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील आदर्की, हिंगणगाव, सासवड, तरडगाव परिसरात पोहोचले आहे. लवकरच हे पाणी अळजापूर, कापशी, बिबी, वाठार, ताथवडा, गिरवी या मार्गाने आंदरुड पर्यंत पोहोचणार असल्याचे ना. रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
औद्योगिकीकरणाचा तरुण पिढीला लाभ
दुष्काळी पट्ट्यातील शेती पाण्याअभावी नापेर राहिल्याने शेतकऱ्यांची कुटुंबे मुंबईच्या लोखंडी जथ्यातील अथवा कापड बाजारातील तुटपुंज्या मजुरीवर आपली गुजराण करत दिवस मोजत होती. आता पाटबंधारे प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांना आपली शेती फुलवून स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळणार आहे. ना. शरद पवार व राष्ट्रवादीच्या माध्यमातून तालुक्यात उभ्या राहिलेल्या औद्योगिक वसाहतीत हजारो कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला कमिन्स हा उद्योग तालुक्यातील विकासाला गती देणारा आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे तरुणांना नोकरी, उद्योग व व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कमिन्सची बस फलटणच्या चौकाचौकात थांबून तरुणांना कामावर घेवून जाते आणि परत आणून सोडते. हे दृश्य फलटणचा औद्योगिक विकास आता पुणे-मुंबईच्या पध्दतीने सुरू झाल्याचे मान्य करायला लावणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण, आरोग्य व नागरी सुविधा
फलटणचा शेती व औद्योगिक विकास गतिमान झाल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांना शैक्षणिक, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज या नागरी सुविधा देण्यातही राष्ट्रवादी आघाडीवर राहिली आहे. तालुक्यात सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे सुरु करुन ग्रामीण जनतेला उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. जिल्हा परिषद व खाजगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे उद्योग, व्यवसायासाठी आवश्यक कोर्सेसचे शिक्षण देण्यासाठी आयटीआय कमिन्स कंपनीला दत्तक देण्यात आले आहे. भविष्यात येणाऱ्या पाटाच्या पाण्याचा विचार करुन शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक वर्षापासून सुरु असलेल्या शेतीशाळेला जोडून उद्यानविद्या महाविद्यालय (हॉर्टिकल्चर कॉलेज) व कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. आयटीआय व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करुन त्याचे व्यवस्थापनही कमिन्सकडे सोपवण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
ग्रामीण भागात जलस्वराज व अन्य योजनांतून पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेसह राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाद्वारे छोट्या-मोठ्या रस्त्यांची कामे काही ठिकाणी पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी सुरू असून उर्वरित कामे मंजूर आहेत. त्यांचीही पूर्तता केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्याच्या सुविधा उपलब्ध
वाढते औद्योगिकीकरण व शेती विकासाचा विचार करता दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. त्यानंतर फलटण-पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरण हाती घेण्यात येणार आहे. तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय फोफावला असून तालुक्यातील अडीच लाख जनावरांपैकी दीड लाख जनावरे दुभती आहेत. या जनावरांना पुरेशा पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुकास्तरावर पशुवैद्यकीय दवाखाना आणि विभागवार पशुवैद्यकीय केंद्रे सुरु करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
विरोधकांना कामच शिल्लक नाही
तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी गेल्या 20 वर्षात ना. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे विरोधकांना तालुक्याच्या हिताची एखादी योजना वा उपक्रम राबवण्याची संधीच उपलब्ध नसल्याने कोणत्याही निवडणुकीत ही मंडळी आपल्यावर व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्यापलीकडे काही करु शकत नाहीत. त्यामुळेच सातत्याने आरडाओरडा करुन आणि रामराजेंना कमी लेखून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तथापि आपल्या कामाची, विकासाची, शेतात पोहोचलेल्या पाण्याची, दर्जेदार शिक्षणाद्वारे आघाडीवर असलेल्या नव्या पिढीची आणि उद्योगधंद्याद्वारे विकासाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचलेल्या तालुक्याची माहिती असल्याने जनता विरोधकांच्या टीकेला भीक न घालता प्रत्येकवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करत आहे. या निवडणुकीतही जनता राष्ट्रवादीलाच पाठिंबा देणार असल्याचा निर्वाळा ना. श्रीमंत रामराजे यांनी दिला.
शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे, श्रीमंत दादाराजे खर्डेकर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, तानाजी गावडे, पोपटराव भोसले यांचीही भाषणे झाली.
बाळासाहेब गौंड यांनी प्रास्ताविकात गुणवरे गटाचा आढावा घेतला. राष्ट्रवादीने यावेळी गुणवरे गावाला उमेदवारी दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन गावातून 85 टक्के मतदान राष्ट्रवादीला देण्याची ग्वाही त्यांनी दिली. अमोल आढाव यांनी सूत्रसंचालन केले. गुणवरे गटातील उमेदवार शिवाजीराव गावडे आणि गणातील उमेदवार सौ. कल्पना भालेराव यांनी आपला परिचय करुन दिला.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, गावोगावचे सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.