ढेबेवाडी मतदारसंघात होणार लक्षवेधी निवडणूक
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:59 AM (IST)
ढेबेवाडी, दि. 27 : मंद्रुळकोळे मूळच्या ढेबेवाडी मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी-राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्या आघाडीविरूध्द पाटण तालुका विकास आघाडी अशी लक्षवेधी निवडणूक होणार आहे. प्रचारासाठी कालावधी कमी असल्याने उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात लोकांच्या गाठीभेटी व बैठकांवर जास्त भर दिला आहे. पंचायत समितीच्या सत्तेसाठी ढेबेवाडी विभागास महत्व असल्याने कॉंग्रेसचे नेते हिंदुराव पाटील व पाटणकर विरूध्द देसाईगट आपली प्रतिष्ठा पणाला लावणार हे निश्चित आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच ढेबेवाडी विभागात राजकीय चर्चांनी वातावरण ढवळून निघाले आहे. पाटण पंचायत समितीची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी आ. विक्रमसिंह पाटणकर व हिंदुराव पाटील यांच्यात समझोता झाला असून मागीलप्रमाणे याही पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी-राष्ट्रीय कॉंग्रेसने आघाडी कायम ठेवली आहे. पाटणकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची समजूत घातली आणि मंद्रुळकोळे (ढेबेवाडी) मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज हिंदुराव पाटील यांनी राष्ट्रवादी व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह पाटण तालुक्यात जोरदार शक्तिप्रदर्शनाने भरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 30 तारीख असली तरी आघाडीचे उमेदवार म्हणून मंद्रुळकोळे गटासाठी हिंदुराव पाटील यांच्या पत्नी सौ.मंदाकिनी हिंदुराव पाटील, गणासाठी सणबूर येथील बाळासाहेब खेडेकर तर गुढे गणासाठी गुढे येथील सौ.सुनंदा पाटील यांच्या उमेदवाऱ्या निश्चित मानल्या जात आहेत.
पाटण विकास आघाडीनेही यावेळी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यायचा या विचाराने सुरूवात केली आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित आहे. माजी आ.शंभूराज देसाई यांचे विभागात अनेकवेळा येणे जाणे यावरून त्यांनी या भागावर दिलेला भर दिसून येत आहे. पाटण विकास आघाडीकडे इच्छुकांनी उमेदवारी मागितली असल्या तरी मागील निवडणुकीत पराभूत झालेले मंद्रुळकोळे येथील हणमंतराव पाटील यांच्या पत्नी सौ. विमल पाटील यांना उमेदवारी देवून त्यांना पुन्हा नशीब आजमावण्याची संधी दिली आहे तर मंद्रुळकोळे गणासाठी महिंद येथील डी. आर. पाटील व गुढे गणासाठी उमरकांचन येथील मनीषा मनोज मोहिते यांची उमेदवारी निश्चित मानल्या जाणाऱ्या उमेदवारांनी मतदारसंघातील गावे, वाड्यावस्त्या पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीस चांगलाच राजकीय रंग आल्याचे दिसत आहे.
हिंदुराव पाटील यांनी मुख्यंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कॉंग्रेस पक्ष चांगलाच मजबूत करत ताकद निर्माण केली आहे. याच ताकदीवर गेली 15 वर्षे ते विभागात सत्तेत आहेत. त्यांना घेवून आपणास सत्ता मिळविता येईल हे आ. विक्रमसिंह पाटणकरांनी ओळखून गेल्या पंचवार्षिकप्रमाणे याहीवेळेस राष्ट्रवादी-राष्ट्रीय कॉंग्रेसने आघाडी केली आहे. हिंदुराव पाटील यांनी गेल्यावेळी आपला 950 मतांनी विजय झाला होता. तो मोठ्या मताधिक्क्याने विजय अपेक्षित होता. त्यासाठी या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळविण्यासाठी त्यांनी आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखली आहे. तर देसाई गटाचे कार्यकर्ते माजी आ. शंभूराज देसाई यांचे एकखंबी नेतृत्व मानणारे आहेत. त्यांच्या आदेशाने कार्यकर्ते यावेळी मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यायचाच या विचाराने कंबर कसून कामाला लागले आहेत. यामुळे तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका घेणाऱ्या ढेबेवाडी भागातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून लढत रोमहर्षक होणार हे निश्चित आहे.