खटाव तालुक्यात पाणी नियोजनासाठी प्रशासन प्रयत्नशील : डॉ. रामास्वामी
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:54 AM (IST)
रहिमतपूर, दि. 27 : खटाव तालुक्याला दिलेल्या पाणी योजनेमध्ये सातत्य ठेवण्यासाठी उरमोडी धरण, पोटकालवा, पंपगृह व साठवण तलावांची पाहणी करुन नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
खटाव तालुक्यासाठी उरमोडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची वितरण व्यवस्था व पोटकालव्याची पाहणी वाठार (किरोली) येथे डॉ. रामास्वामी
यांनी नुकतीच केली. त्यावेळी ते बोलत होते.
उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, धोम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, व्ही. डी. जाधव, सहाय्यक अधिकारी सौ. भिलारे, एस. आर. कुलकर्णी, एस. एस. पाटील उपस्थित होते. परळी येथील उरमोडी धरणातील पाणीसाठा, बोगदा, अंबवडे व वेण्णा जलसेतू अपूर्ण असलेल्या कॉलर जोड-कालव्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. आरफळ कालवा, सीआर-एचआर गेट पाहणीनंतर वाठार (किरोली) येथे साठवण तलाव व पंपगृहाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी नकाशा व आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.