Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ना. पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वाभिमान वाढविण्यासाठी जि. प., पं. स. कॉंग्रेसच्या ताब्यात द्या : आ. गोरे
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:57 AM (IST)
Tags: news
वाई, दि. 27 ः महात्मा गांधींच्या विचारांची कॉंग्रेस वाढविण्यासाठी आपली संस्कृती जोपासतानाच आजच्या कलीयुगात राजकारणात जिवंत राहण्यासाठी आवश्यक रणनीती अवलंबलीच पाहिजे. बाजारात जे विकतं, जे खपतं तेच विकलं पाहिजे. चुकीच्या दिशेने जाणाऱ्यांना वेळीच रोखले तरच कॉंग्रेस जिवंत राहील, असे परखड मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त करुन पंचायत समिती व जिल्हा परिषद कॉंग्रेसच्या ताब्यात देवून जिल्ह्याचे सुपुत्र व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वाभिमान वाढवूया, असे आवाहन केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बावधन येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वाई तालुक्यातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ भैरवनाथ मंदिरात फोडण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, ज्येष्ठ नागरिक सर्जेराव पिसाळ यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. सौ. अल्पना यादव, सौ. ललिताताई पिसाळ, सौ. राधाताई शिंदे, सौ. रत्ना सणस, सौ.
कमल रासकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
आ. गोरे म्हणाले, जिल्ह्याने बारामतीकरांना आजवर भरभरुन दिले आहे. याच्या बदल्यात त्यांनी मात्र जिल्ह्यात उगमस्थान असलेल्या विविध धरणांचे पाणी बारामती, सांगलीला पळविले. जिल्ह्याने राष्ट्रवादीला जास्तीत जास्त आमदार देवूनही जिल्ह्यातील धरणांचा स्थानिकांना म्हणावा असा फायदा झाला नाही. राज्यात 35 जिल्हे असून आजवर केवळ 5 जिल्ह्यांनाच राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यात सातारा सर्वाधिक भाग्यवान आहे. सातारा जिल्ह्याने 3 वेळा मुख्यमंत्रिपदाचा मान मिळविला आहे. जिल्ह्याचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे आले आहे. लोकांनी त्यांच्याद्वारे  विकासाची संधी साधण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता कॉंग्रेसच्या ताब्यात द्यावी.
प्रत्येकवेळी निवडणुका पैशाच्या आणि गुंडागर्दीच्या जीवावर जिंकता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कारणे शोधणे बंद करावे. राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर कॉंग्रेस पक्षाची अत्यंत कठीण परिस्थिती असताना मदनदादांच्या कणखर नेतृत्वामुळेच जिल्ह्यात कॉंग्रेस जिवंत राहिली. किसनवीर कारखान्याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले. दादांनी दिलेल्या सर्वाधिक ऊस दराने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला पण तरीही वेगळी भूमिका घेत असतील तर चुकीचे आहे. दादांचा संपर्क नसल्याचा आरोप करुन इतरांपेक्षा आपल्याच कार्यकर्त्यांनी त्यांना बदनाम केले. खरे तर सैनिक म्हणून लढणाऱ्यांनी सेनापतीकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. सैनिकांनी पळवाटा शोधणे चुकीचे आहे. कारखान्याच्या विकासासाठी अधिक वेळ दिल्याने कदाचित दादा संपर्कात कमीही पडले असतील परंतु आपले सैनिक देखील मेहनतीत कमी पडले हे वास्तव आहे. निवडणुका या सैनिकांच्या जीवावरच जिंकल्या जातात. "माण' मध्ये मी तुफान निर्माण केले नसून ते माझ्या सैनिकांनी केले आहे. जयकुमार गोरेंना नुसते बोलावून काही होणार नाही. माझ्या विचारांचा आणि माझ्या सैनिकांनी उभारलेल्या तुफानाचा आदर्श घेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आनंदराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री हे आपल्या जिल्ह्यातील असल्याने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्याद्वारे मार्गी लागत आहेत. त्यांना जिल्ह्यातील प्रश्नांची जाण असल्यानेच जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि खंडाळा साखर कारखाना या प्रकल्पांना गती मिळाली. असे असताना जिल्ह्यात बारामतीचे कार्ड वापरण्याची गरज आहे का, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.
मदन भोसले म्हणाले, पंचायत समितीचा कारभार निष्प्रभ झाल्याने त्यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य असलेल्या 12 जणांची साधी नावे देखील सर्वसामान्यांना आठवत नाहीत, अशी माणसेच पुन्हा तिथे पाठवायची का? याचा सद्‌सद्‌ विवेकबुध्दीने विचार करावा. खंडाळा कारखान्याला परवानगी मिळाल्यानंतर भूमिपूजन कार्यक्रमाला तुम्ही येवू नका अशी गळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून लक्ष्मणराव पाटील यांनी घातल्याचा गौप्यस्फोट करुन मदनदादांनी कारखान्याच्या उभारणीत उच्च न्यायालयाच्या अडचणी उभ्या करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची का, असा प्रश्न केला.
ते म्हणाले, समाजासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ता मागे पडला असून त्याची जागा आत्ता दलाल, कंत्राटदार आणि मध्यस्थी करणाऱ्यांनी घेतली आहे. त्यांच्या मध्यस्थीमुळे पाच-दहा टक्के मतांच्या जीवावर निवडणुकीचा निकाल वेगळा लागत आहे. या वेगळ्या मार्गाने निवडून आलेल्यांना विकासाची अथवा सामाजिक बांधिलकीशी घेणे-देणे नसल्याने ते विकास काय साधणार, असा सवाल करुन मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील पराभव विरोधकांनी नव्हे तर आम्हीच केला. एकमेकांतील गैरसमज दूर करून सर्वांनी एकसंघ राहून सक्षम उमेदवारांना निवडून देऊया. मेळाव्यात माजी उपसभापती ललिताताई पिसाळ, मारुती दाभाडे, हणमंत भोसले यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सौ. अल्पना यादव, महादेव मांढरे, राजेंद्र कदम, ललिताताई पिसाळ, सौ. ज्योतीताई पिसाळ, इंदुमती चव्हाण, कमल रासकर यांनी मनोगत व्यक्त केले.
विलास पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचलन केले.  मदन ननावरे यांनी आभार मानले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: