Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आईचं नातं वेदनेशी असते :सिंधुताई सपकाळ
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 01:03 AM (IST)
Tags: news
कराड, दि. 27 : सायकलीच्या मागच्या चाकाप्रमाणे संसाराचा सर्व भार आईवर असतो. आईचं नातं वेदनेशी असते तर बापाचं नातं भीतीशी असते. आई अंधारात उजेडासाठी काळजाची वात करते, असे मत अनाथांच्या माय सौ.सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
वडगाव हवेली, ता. कराड येथील बंडूदादा वैचारिक विकास ग्रंथालयाच्या 4 थ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे होते. यावेळी शासकीय ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल सुनील खैरे, अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त हिंदुराव साळुंखे, सहकाराचे माजी सहआयुक्त बी. बी. साळुंखे, संयोजक डॉ. एस. बी. साळुंखे, सौ. जयश्री साळुंखे, सरपंच राजन संदे, माजी सरपंच सत्यवान जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. सौ.सपकाळ म्हणाल्या, पोरांपेक्षा पोरी सोशिक असतात. पोरींनी उथळपणा सोडावा. नऊवारीतील स्त्री जग जिंकू शकते,  हे भारताच्या इतिहासात हे घडलं आहे. आपल्याजवळ काही नसतं हे जिला समजलं तिथं मुलीचा जन्म होतो.  देशाच्या वेदना झाकण्यासाठी महिलेचा जन्म असतो. डॉ. एस. बी. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सौ. जयश्री साळुंखे यांनी स्वागत केले. प्रकाश चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील मान्यवर, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: