Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सर्वसामान्य लोकांसाठी अधिकाऱ्यांनी काम करावे
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 01:05 AM (IST)
Tags: news
श्याम देशपांडे यांचे आवाहन
कराड,दि.27 : समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम केल्यास यशस्वी अधिकारी होता येते. त्यासाठी होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांनी समाजाची नाळ कायम ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी काम करावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे यांनी केले.
कोल्हापूरच्या श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या येथील स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. एस. एन. पाटील होत्या. यावेळी एन्व्हायरो क्लबचे चंद्रकांत जाधव, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक बी. एस. खोत, प्रा. डॉ. सतीश घाटगे, प्रा. डॉ. माधवी देसाई, प्रा. बी. जी. कोरे, कामगार अधिकारी शीतल कुलकणी, प्रा. सौ. तांबवेकर, राहुल साळुंखे, स्नेहल यादव, प्रतीक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशपांडे म्हणाले, प्रशासकीय सेवा हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचा उत्तम मार्ग आहे. त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची दु:खे कळतात. त्यांच्यापर्यंत जाऊन काम केले पाहिजे, तरच यशस्वी अधिकारी म्हणून आपल्याला पोचपावती मिळू शकते. होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांनी समाजाची नाळ कायम ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी काम करणे आवश्यक आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी साहित्याची जाण असणे आवश्यक आहे. कलेचा मनमुराद आनंद घेऊन जीवन जगले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी थोडी रिस्क घेणे आवश्यक आहे. जातिभेद न बाळगता  काम करावे. .
यावेळी प्राचार्या एस. एन. पाटील, शीतल कुलकर्णी, प्रा. सौ. तांबवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रा. बी. एस. खोत यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: