चाफळ बीटातील केंद्र प्रमुखांकडून शिक्षक वेठीस
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:55 AM (IST)
चाफळ, दि. 27 : चाफळ विभागातील शिक्षण विभाग शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्यादृष्टीने अद्यापही अग्रेसर आहे. ज्ञानदान करणारी मंडळी सुध्दा उच्चशिक्षित असल्याने शिक्षण विभागाचा चांगलाच नावलौकिक आहे. मात्र चाफळ बीटातील केंद्रप्रमुखांच्या नव्या फंड्यामुळे शिक्षकांमधून नाराजीचे सूर निघत आहेत. केंद्रप्रमुखांकडून येथील शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. सध्या चाफळ बीटातील शिक्षणाची गंगा उलटी वाहू लागली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
चाफळ बीटांतर्गत चाफळ, वाघजाईवाडी, केळोली, नाणेगाव अशी चार केंद्रे आहेत. या ठिकाणी तीन केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. तर या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाग विस्ताराधिकारी कार्यरत आहेत. एकूण 42 शाळांवर शिक्षकांचीही पटसंख्येनुसार नेमणूक आहे. ज्ञानदान करणारी गुरूजन मंडळी आपले काम प्रामाणिकपणे करीतच असतात. आज बीटातील शाळांमध्ये काही शाळांचा अपवाद वगळता इतर शाळांमध्ये सर्वच शिक्षक प्रामाणिक काम करतातच असे नाही. काही शाळांचे शिक्षक चक्क केंद्रप्रमुखांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत आहेत. तर केंद्रप्रमुख काही शाळांतील शिक्षकांना मोबाईलद्वारे बोलवून घेतात व त्यांच्याच दुचाकीवरून शाळा तपासणीची नाटके करतात. परिणामी केंद्रप्रमुखांबरोबर फिरणाऱ्या शिक्षकांच्या शाळेतील मुलांना मात्र वंचित रहावे लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याकडे शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांचेही जाणून बुजून दुर्लक्ष होताना दिसते.
चारचाकीमधून फिरणारी ही अधिकारी मंडळी शाळा तपासणीच्या तसेच भेटीच्या निमित्ताने एखाद्या शाळेत गेली असता नजरचुकीने एखादा शिक्षक रजेचा अर्ज फाईलला लावण्याचे विसरला अथवा एखादा गैरहजर असल्याचे निदर्शनास आले, की संबंधित केंद्रप्रमुख त्या शिक्षकांवर दबाव टाकून एक दिवसाच्या पगारातील निम्मा पगार वसूल करत आहे. या केंद्रप्रमुखाच्या नव्या फंडामुळे शिक्षकवर्ग वैतागला आहे. याची गटशिक्षणाधिकारी यांनी गोपनीय माहिती मिळवून अशा मनमानी करणाऱ्या केंद्र प्रमुखांवर कारवाई करावी, अशी मागणी या फंड्याला बळी पडलेल्या शिक्षकांमधून होत आहे. चाफळ विभाग हा दुर्गम व डोंगराळ असा भाग असल्याने बहुतांशी शाळा डोंगराच्या कुशीत आहेत. याठिकाणी केंद्रप्रमुखांनी शाळाभेटीसाठी जाणे क्रमप्राप्त असतानाही संबंधित केंद्रप्रमुख शिक्षकांनाच रजिस्टर चाफळ अथवा वाघजाईवाडी येथील शाळेत घेवून यायला सांगून भेट दिल्याचा दिखावा करत आहेत. या सर्व गोष्टी होत असताना गटशिक्षणाधिकारी यांचे मात्र या बाबींकडे लक्ष नाही. त्यांनी या विषयात लक्ष घालून प्रामाणिकपणे ज्ञानदान करणाऱ्या मंडळींची या मनमानीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटका करावी, अशीही मागणी शिक्षकवर्गातून होत आहे.