स्व. आण्णाजी पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अनमोल : प्रा. कोष्टी
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 01:02 AM (IST)
कराड, दि. 27 : आण्णाजी पवार यांनी लावलेल्या ज्ञानरुपी वटवृक्षाखाली आज असंख्य चिमणी पाखरे ज्ञान घेेत आहेत. शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असलेल्या ग्रामीण भागातील मुलांसाठी आण्णाजी पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील हे कार्य अनमोल आहे, असे प्रतिपादन झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी केले.
वहागाव, ता. कराड येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिल्पकार आण्णाजी पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. अमृतराव पवार, पंचायत समिती सदस्य भास्करराव पवार, सचिव गोविंदराव थोरात, आत्माराम यादव, आनंदराव पिसाळ, प्राचार्य कदम, संभाजी पवार, वामन मोरे, एस. पी. पवार, भिकू पवार, बाजीराव पवार, गणीभाई मुल्ला व मान्यवर उपस्थित होते.
जीवनात हास्य आवश्यक
प्रा. कोष्टी म्हणाले, आज मुले व्ही.डी.ओ. गेम., टी.व्ही. यांच्या मायाजाळात अडकली असून विनोद विसरली आहेत. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जीवनात हास्य असणे आवश्यक आहे. ते हास्य मिळवण्यासाठी मुलांनी विनोदबुद्धी जोपासली
पाहिजे. स्व. पवार यांनी ग्रामीण भागातील
मुलांसाठी केलेले हे कार्य उल्लेखनीय असून त्याचा लाभ मुलांनी घ्यावा.
शिक्षणातील महामेरू दुर्मीळ
प्रा.चव्हाण म्हणाले, स्व. आण्णाजी पवार यांच्यासारखे शिक्षणातील महामेरु आज दुर्मीळ झाले आहेत. त्यांनी शिक्षणक्षेत्रात केलेले कार्य इतरांसाठी आदर्शवत आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच निवृत्त पोलीस कबीर ताटे यांनी आण्णाजी पवार यांच्यावर केलेल्या कवितेचे प्रकाशनही करण्यात आले. ऍड. अमृतराव पवार यांनी स्वागत केले. युवराज पवार यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक आय. वाय. मुल्ला यांनी अहवाल वाचन केले. वर्षा झिमरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप खारवते यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.