Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
साखर कारखान्याकडे उद्योग व्यवसाय म्हणून पाहू नका : साळुंखे-पाटील
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: news
सुरवडी, दि. 27 : साखर कारखान्याकडे केवळ उद्योग व्यवसाय म्हणून न पाहता या संस्थेद्वारे परिसरातील ग्रामस्थांना व्यवसाय उद्योगाच्या संधी आणि अनेक चांगल्या सुविधा निर्माण करुन देण्याचा त्याचबरोबर या भागाला पूर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन न्यू फलटण शुगर वर्क्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी केले.
न्यू फलटण शुगर वर्क्सच्या परिसरात सुरु करण्यात आलेल्या कारखाना मालकीच्या पेट्रोल पंपाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साखरवाडीचे सरपंच माणिकआप्पा भोसले, उपसरपंच अरुण गायकवाड, हिरालाल पवार, किसनराव भोसले, बाजार समितीचे संचालक धनंजय साळुंखे (पाटील) आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमारे 75 वर्षांपूर्वीचा हा कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्याने बंद पडल्यानंतर तो पुन्हा सुरू करुन उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी या भागातील ऊस उत्पादक, कारखान्याचे  कामगार व परिसरातील ग्रामस्थांनी एकत्रित शक्ती आपल्या पाठीशी उभी केल्यानेच धाडसाने पावले टाकून  केलेल्या प्रयत्नांना यश आले. आजही या सर्वांच्या पाठिंब्यावरच आपण विविध प्रकल्प उभारुन त्याद्वारे या भागातील लोकांना विविध सेवा सुविधा देण्याचा त्याचप्रमाणे याद्वारे लोकांना विविध उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असल्याचे साळुंखे (पाटील) यांनी स्पष्ट केले. या परिसराचे वैभव असलेल्या न्यू फलटण शुगर वर्क्सला प्रगतीपथावर नेताना येथील शेतकरी, कामगार, व्यापारी, सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेल्या विविध सुविधा कारखान्याद्वारे उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. याद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील उच्च प्रतिच्या आधुनिक शैक्षणिक सुविधा लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचे साळुंखे (पाटील) यांनी सांगितले.  महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांना स्वकर्तृत्वावर पुढे येण्याची संधी गारमेंट उद्योग समूहाद्वारे लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  साखरवाडी परिसरात अनेक वर्षापासून निर्माण झालेली दुरदृष्टीची पोकळी प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांच्यामुळे भरुन निघाली आहे. येथील जनतेने काही सांगण्याआधीच साळुंखे (पाटील) कल्पकतेने विविध उपक्रम सुरु करुन सर्वसामान्यांना दिलासा देत असल्याबद्दल त्यांचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान असल्याचे हिरालाल पवार, निवृत्त प्राचार्य भीमराव बोंद्रे, गुलाबराव भोसले गुरुजी, दशरथशेठ रावळ, किसनराव भोसले, माणिकआप्पा भोसले, बाळासाहेब जाधव, जयराम भोसले, सुरेश रणवरे यांनी स्पष्ट केले.
साखरवाडीचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी येथे कायम स्वरुपी व्याख्यानमाला सुरु करावी, सुसज्ज वाहनतळाची उभारणी करावी, दुष्काळी पट्ट्यातील जिरायत  भागासाठी उपसा सिंचन योजना सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली. कारखान्यातील अधिकारी राजेंद्र काशिनाथ भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखा भोसले यांच्याहस्ते सत्यनारायण महापूजा व पेट्रोल पंपाचे विधीवत पूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. खानविलकर, काशीनाथ भोसले, तानाजी गायकवाड, बबन जगताप, मंगाभाई शेख, सुरेश जाडकर, सुरेश जगताप, चिफ इंजिनिअर शितोळे, सुरेश भोसले, राजेंद्र गाडे, उमाकांत भोसले यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, व्यापारी उपस्थित होते. कारखान्याचे सेक्रेटरी चंद्रशेखर किरपेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: