Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एस. टी. चालकाच्या बेभान थरारामुळे पुण्यात मृत्यूचे तांडव
ऐक्य समूह
Thursday, January 26, 2012 AT 02:17 AM (IST)
Tags: news


9  निरपराध्यांचे बळी; 27 जण जखमी
 
पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) एका माथेफिरु चालकाने स्वारगेट बसस्थानकात उभी असलेली सातारा-स्वारगेट-सातारा ही विनाथांबा बस ताब्यात घेऊन ती पुण्यातील विविध भागात सुमारे 25 किलोमीटर अंतरापर्यंत बेभानपणे चालवून तब्बल दीड तास अक्षरश: मृत्यूचे तांडव केले. त्याच्या या कृत्याने 9 निरपराध्यांचे बळी घेतले तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच रिक्षा, दुचाकी, चारचाकी अशा 30 वाहनांचे नुकसान झाले आहे. बेभानपणे बस चालवणाऱ्या चालकाचे नाव संतोष मारुती माने (वय 40) असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहर तर हादरलेच, पण, निरपराध्यांचा बळी गेल्याने सर्व स्तरातून हळहळ आणि या घटनेने संतापही व्यक्त करण्यात आला.

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे सातारा बसस्थानकातून पुणे-सातारा-पुणे ही विना वाहक, विना थांबा  पहिली बस (क्र. एम.एच. 14 बीटी 1532) ही सकाळी 6 वाजता सातारा येथून सुटून 8 वाजता स्वारगेट बसस्थानकात पोहचली. त्यानंतर त्यातील सर्व प्रवासी उतरल्यावर बसचा मूळ चालक संतोष हेंद्रे दरवाजा लावून लघु शंकेसाठी गेला. त्याचवेळी संतोष माने या चालकाने ती बस स्थानकातून पळवली. त्यानंतर त्याने ही बस आऊट गेटमधून बाहेर काढली आणि जेधे चौकात बस वळवून तो पुन्हा स्थानकात आला. नंतर पुन्हा बस घेऊन तो बाहेर आला आणि शंकरशेठ रस्त्याने उलट्या दिशेने (रॉंग साईड) सोलापूर बाजार चौकापर्यंत गेला. तेथून त्याने ती बस कॅम्प परिसर, भवानी माता मंदिराकडून थेट सेव्हन लव्हज चौकापर्यंत भरधाव वेगाने आणली. नंतर महर्षी नगरमार्गे मित्रमंडळ चौकातून सारस बागेकडून दांडेकर पूलमार्गे जाणाऱ्या मार्गावर उलट्या दिशेने बस चालवली. माने हा बेभानपणे वाहने आणि पादचाऱ्यांना धडका देत निर्दयीपणे निघाला असता पुलगेट चौकापासून गस्तीवरच्या पोलिसांनी आपल्या दुचाकीवरुन त्याचा पाठलाग केला. बस थांबवण्यासाठी टायरवर गोळीबारही केला पण, निशाणा साधण्यात अपयश आल्याने तो तसाच पुढे निघून गेला. रस्त्यामध्ये त्याला अडवण्यासाठी नागरिकांनी बॅरेकेट्‌स आडवी लावली. गाड्याही आडव्या लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यालाही त्याने दाद दिली नाही. रस्त्यात येईल त्या माणसाला अमानुषपणे धडका देऊन तसाच बेभानपणे बस घेऊन तो सुटला. सिंहगड रस्त्यावर निलायम सिनेमागृहाजवळील उड्डाण पुलाच्या खाली माने याची बस आली असता त्याच्या समोर चार चाकी गाड्या आल्या. त्यांना तो धडकला त्यावेळी त्याचा बसवरचा ताबा सुटून     बस दुभाजकावर आदळली आणि थांबली. त्यावेळी त्याचा पाठलाग करणारे लोक आणि स्थानिक नागरिकांनी त्याला बसमधून खाली खेचून  चोप दिला. काही वेळातच मागून आलेल्या तिघा पोलिसांनी माने याला ताब्यात घेतले. सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी सुरू झालेले हे थरारनाट्य सुमारे दीड तासाने संपले. मात्र त्यामध्ये 5 जण जागेवरच चिरडून मृत्युमुखी पडले आणि चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 27 लोक जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अनेकांचे हात, पाय तुटले आहेत. जखमींवर ससून, सह्याद्री, जहॉंगीर, शारदा अशा विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये पूजा पाटील (वय 19), संतोष तिकोने (वय 46), रामलखन शुक्ल (वय 23), पिंकेश खंडेलवाल (30), मिलिंद गायकवाड (वय 42), श्वेता ओसवाल (वय 27), शुभांगी मोरे (वय 36), अक्षय  पिसे (वय 18) व नवव्या मृताचे नाव अद्याप समजलेले नाही.
पीडितांच्या संतप्त नातेवाईकांचे आंदोलन
दरम्यान, ससून रुग्णालयाबाहेर पीडितांच्या संतप्त नातेवाईकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि संतप्त नातेवाईकांमध्ये बाचाबाचीही झाली. मृत शुभांगीच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. काही काळ रास्ता रोकोही करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. मानेला माथेफिरु संबोधल्याने तो त्याचा फायदा घेऊन न्यायालयात सुटू शकतो. त्यामुळे त्याला माथेफिरू म्हणू नका असे आवाहन शुभांगीच्या नातेवाईकांनी यावेळी केले.
* मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ससून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
शफिक कुट्टी (कसे पकडले)
मी पूना कॉलेजचा विद्यार्थी असून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मी माझ्या मोटारसायकलवर कॉलेजला चाललो असताना एक एस. टी. बसगाडी उलट्या दिशेने चालली होती. सर्व नागरिकांना उडवत गाडी सोलापूररोडच्या दिशेने चाललेली मी पाहिली. गाडीचा सर्वजण पाठलाग करत होते. पण गाडी कोणाच्या आवाक्यात येत नव्हती. दोघा जणांना बसच्या मागच्या बाजूस चढण्यात यश आले. मात्र ब्रेक लागल्यानंतर ते दोघे कुठे पडले हे कळले नाही. पोलिसांनी एस.टी.च्या चाकावर देखील फायरी झाडल्या. पण गाडी कोणालाही थांबता थांबत नव्हती. मी माझ्या मोटारसायकलवर त्याचा पाठलाग करत होतो. तो सगळ्यांना उडवत अप्सराचौक - मुकुंदनगर - लक्ष्मीनारायण टॉकीजमार्गे पुढेच चालला होता. पुढे तो मित्रमंडळ चौकातून सारसबागेच्या समाधान भेळवाले यांच्या समोरच्या बाजूने त्याने गाडी पुढे घातली. तेथे त्याने एका पॅगो गाडीला उडवले. त्याने पुढे निलायम टॉकीजच्या येथे दोन कारला उडवले. एस.टी.गाडीचा वेग त्या ठिकाणी कमी झाला. तेवढ्यात मी माझी गाडी साईडला पार्क केली. पळत जावून गाडीचा दरवाजा ताकदीने उघडला. बसमध्ये प्रवेश केला. त्याचा पाय एक्सिलेटरवर होता. मी त्याच्या कॉलरला पकडले. त्याचा गिअरवचा हात काढला. त्याला बाजूला ओढले. त्याला बाहेर ओढल्यावर लोकांनी त्याला मायायला सुरूवात केली. त्यावेळेस अनेक लोक गोळा झाले. मी अजून होणारा मोठा अनर्थ टाळू शकलो, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
रुग्णांच्या प्रतिक्रिया हरजीवन हॉस्पिटल, पुणे : महेश मारुती गाढवे
महेश मारुती गाढवे हे स्वारगेट  येथील हरजीवन रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना डोक्याला पाच टाके,  छातीवर तसेच बरगडीला मार लागला आहे. तसेच डोक्याला सूज आहे. या प्रकरणाबाबत बोलताना जखमी गाढवे म्हणाले, माझा व्यवसाय रिक्षा चालवण्याचा  असून नेहमी प्रमाणे स्वारगेट एस. टी. आगारा बाहेर असलेल्या रिक्षा स्टॅंडला रिक्षा उभी केली होती. माझ्या रिक्षासमोर तीन ते चार जण थांबले होते. एस. टी. आगारातून एक जण 70 ते 80 च्या स्पीडने डेपोतून त्याने बस काढली. तेथे स्वारगेट सिग्नलला त्याने
सातारारोडला एकाला उडवले. आम्ही तेथे थांबलेलो सर्वजण एस.टी.गाडीचा नंबर नोेंद करण्यासाठी पळालो. तेवढ्यात एस. टी. महामंडळाच्या
अधिकाऱ्याची गाडी तेथे आली. आम्ही त्यांना गाडीचा नंबर सांगण्यासाठी
गेलो असताना तो माथेफिरू इसम गाडी पुन्हा इनगेटमधून आत घेऊन आला. त्याने आम्हाला उडवले. वेगाने तो सोलापूररोडच्या दिशेने वाहनांना उडवत चालला होता.
पिरसिंग धनसिंग हजारे (42, रा. कांदे आळी जनता वसाहत)
पिरसिंग हजारे हे स्वारगेट येथील हरजीवन रुग्णालयात उपचार घेत असून पाठीच्या मणक्याला, गुडघ्याला मार, गालाला तसेच हाताला मार लागला आहे. या प्रकरणाबाबत बोलताना हजारे यांनी सांगितले, मी स्वारगेटला सकाळी कामा निमित्त चाललो असताना मी पॅगो गाडीत स्वारगेटला जाण्यासाठी बसलो. गाडी पर्वतीच्या ब्रीजच्या खाली असताना उलट्या बाजूने सिंहगडरोड आली. पॅगो सोबत आम्हाला उडवले.
 
 

एस. टी.चा मूळ चालक संतोष हेंद्रे
सकाळी सहा वाजता मी एम.एच. 14 बीटी 1532 ही गाडी साताऱ्यावरुन काढली. आठ वाजता स्वारगेटला पोहोचलो. सर्व प्रवाशांना उतरवून गाडीचे दरवाजे चावीने बंद करुन लघुशंकेसाठी गेलो असता तेवढ्यात माझी गाडी कुणीतरी सुरू केल्याचे दिसले. बघताबघता गाडीने एकाला उडवले. डाव्या बाजूने गाडी काढून सोलापूर रोड मार्गे त्याने हातगाडे आणि जे दिसेल त्या वाहनांना उडविण्यास सुरूवात केली. सर्व नागरिक त्याच्या मागे पळत होते, अशी माहिती मूळ चालक संतोष हेंद्रे याने दिली.
 
जखमींना एस. टी.कडून मदत जाहीर
या अपघातात जखमींवर विविध रुग्णालायत उपचार सुरू आहेत. 14 जणांवर उपचार सुरू असून दोन जण गंभीर आहेत. महापौर मोहनसिंग राजपाल यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींचीविचारपूस करुन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी घटनेतील मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये आणि गंभीर जखमींना 75 हजार रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 
 
30 वाहनांचे नुकसान
कोण आहे संतोष माने?
 

संतोष मारुती माने (वय 40) हा गेल्या अनेक वर्षांपासून एसटीचा चालक म्हणून काम करीत आहे. 4117 हा त्याचा बॅच क्रमांक आहे. 2009 सालापासून तो स्वारगेट स्थानकात चालक म्हणून रुजू आहे. तो मुळचा सोलापूर जिल्ह्यातील कौंठाळे गावचा रहिवासी असून त्याचे कुटुंबीयही सोलापूर येथेच वास्तव्यास आहेत. कामास असल्यापासून त्याच्या बाबतीत कुठलीही तक्रार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी तो स्वारगेट-गंगापूर-स्वारगेट अशी फेरी पूर्ण करून संध्याकाळी साडेसात वाजता आला होता. स्थानकाच्या गेस्ट हाऊसमध्येच तो रहात आहे. बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता त्याला ग्रामीण ड्युटी लावली होती. पण त्याने मागितलेली लवकरची ड्युटी वरिष्ठांनी नाकारल्याने प्रक्षुब्ध मनस्थितीतच संतोषने सरळ सातारा-स्वारगेट-सातारा बस ताब्यात घेऊन हे कृत्य केले. संतोष माने हा मनोरुग्ण असल्याची चर्चा आहे. तो मानसिक रुग्ण असून गेल्या काही वर्षांपासून उपचार घेत असल्याची माहिती त्याच्या गावच्या सरपंचांनी दिली आहे. गेल्या 13 वर्षांपासून तो पुण्यात राहायला आला होता. मात्र तो मानसिक रुग्ण असल्याचा राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने इन्कार केला आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: