मेढा आणि कुडाळ गट बनला डोकेदुखी
ऐक्य समूह
Thursday, January 26, 2012 AT 02:21 AM (IST)
बारामतीत ना. अजित पवार-आ. शिवेेंद्रसिंहराजेंची चर्चा; अंतिम निर्णय नाही
सातारा, दि. 25 (विनोद कुलकर्णी) : जावली विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे मेढा आणि कुडाळ गट आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. या दोन गटाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आ.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अखेर बारामती गाठली आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी त्यांनी या प्रश्नावर चर्चा केली. मात्र कोणताही तोडग्याचा अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे या दोन्ही गटाचा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी जटील झाला आहे.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच जावली तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सावध पवित्रा घेतला आहे. प्रत्येक निर्णय घेताना कोणतीही चूक होवू नये याची दक्षता त्यांनी घेतली आहे. त्यामुळे जावली तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तिकीट वाटप करतानाही त्यांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतले आहेत. मेढा गटात राष्ट्रवादीकडून जावली पंचायत समितीचे सभापती बापूराव पार्टे आणि महाबळेश्वर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य अमित कदम यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरले आहेत. या दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा प्रश्न पक्ष आणि आमदारांपुढे पडला आहे. जावली तालुक्याचे माजी आमदार स्व. जी. जी. कदम यांचे अमित कदम हे सुपुत्र आहेत. गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बाळासाहेब भिलारे यांच्यासाठी जिल्हा परिषदेऐवजी पंचायत समितीसाठी लढले. त्यामुळे यावेळी पक्षाकडे त्यांनी जिल्हा परिषदेचे तिकीट मागितले आहे. मेढा येथे त्यांचे घर असून गेल्या सहा महिन्यांपासून तेथील जनसंपर्क अमित कदम यांनी वाढवला आहे. त्याचवेळी जावली पंचायत समितीचे सभापती बापूराव पार्टे यांनीही दोनवेळा सभापतिपद भूषवले आहे. केळघरपासून मेढ्यापर्यंत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. वेण्णा दक्षिण भागातील सर्वच गावात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
त्यामुळे या दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायचा याचा निर्णय पक्षाला व आमदारांनाही घेता आलेला नाही. मेढा गटापेक्षाही कुडाळ गटातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कुडाळ गटातून सौरभ शिंदे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यास जावलीचे तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या गटातून उमेदवारी मागितलेल्या तेरा आ. शिंदे समर्थकांनी पक्षाकडे आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी पक्षाने धुडकावून लावताच या तेरा जणांनी बंडाचे निशाणउभारले आहे. त्यापैकी बहुतांशी जणांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत. त्यामुळे या गटातील निवडणूक राष्ट्रवादीसाठी आव्हानात्मक बनली आहे. ज्या जावली तालुक्याने गेल्या निवडणुकीत बिनविरोधचा प्रयोग अनुभवला होता, त्याच जावली तालुक्यात बंडखोरी आणि उमेदवारी निवडीवरुन चांगलेच राजकारण जुंपले आहे. या राजकारणापाठीमागे स्थानिक नाराजी आहे का अन्य कोण पडद्यामागून डावपेच खेळत आहे, यातील सत्य लवकरच बाहेर येईल. मात्र तोपर्यंत विरोधकांनी मेढा गट आणि कुडाळ गट जिंकण्यासाठी नाराजांना आपल्याकडे वळवण्याचे डावपेच खेळले आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण आपल्या पथ्यावर कसे पडेल यासाठी विरोधकांनी व्यूहरचना केलेली आहे. विरोधकांची व्यूहरचना आणि पक्षातील गटबाजीचे चक्रव्यूह भेदण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनीही आपले डावपेच सुरु केले आहेत. त्यांच्या राजकारण करण्याच्या पध्दतीचा अनुभव लक्षात घेता इतक्या लवकर आपले पत्ते ते उघड करणार नाहीत. मात्र हळूहळू जावलीच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करण्यासाठी करावे लागणारे सगळे डावपेच ते खेळतील. निवडणूक निकालानंतरच त्यांना किती यश मिळाले याचे मोजमाप करता येणार आहे.