Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
श्री बालाजी आणि श्री पद्‌मावती-श्रीभूदेवी यांच्या प्रतीकात्मक विवाह सोहळ्याने फेडले उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे
ऐक्य समूह
Thursday, January 26, 2012 AT 01:49 AM (IST)
Tags: news


सातारा, दि. 25 : समर्थ रामदास स्वामी व छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहूनगरीतील सैनिक स्कूलच्या मैदानावर शुक्रवारी सायंकाळी श्री बालाजी आणि श्री पद्‌मावती-श्रीभूदेवी यांच्या 99 व्या प्रतीकात्मक दिव्य विवाह सोहळ्याने अक्षरश: उपस्थितांच्या डोळ्याचे पारणेच फेडले. हा प्रतीकात्मक विवाह सोहळा मुंबईच्या तिरुमला तिरूपती देवस्थान कल्याणोत्सव कमिटीने नुकताच आयोजित केला होता.
सायंकाळी 4  वाजता दिव्य विवाह सोहळ्यासाठी निपाणीहून श्री बालाजी आणि श्री पद्‌मावती-श्रीभूदेवी यांच्या मूर्ती सैनिक स्कूलच्या मैदानावर आणण्यात आल्या. पुणे येथील मिरॅकल इव्हेंट मॅनेंजमेंट कंपनीने या सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. सायंकाळी 6 च्या सुमारास मंत्रोच्चारात विवाहविधीस प्रारंभ झाला. याप्रसंगी श्री बालाजी देवस्थानच्या पुरोहितांनी पुण्याहवाचन, स्थलशुध्दी, अंकुरअर्पणम:, नवग्रहशांती, होमहवन, मंगळसूत्र पूजन विधी, विवाहविधी यासारखे अनेक धार्मिक विधी केले. त्यानंतर श्री बालाजी आणि श्री पद्‌मावती-श्रीभूदेवी यांचा 99 वा प्रतीकात्मक दिव्य विवाह सोहळा झाला. हा सर्व विवाह विधी सोहळा जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या हस्ते झाला. याप्रसंगी श्री बालाजी देवस्थानच्या भजनी मंडळाच्या भजनाने परिसर दुमदुमून गेला. या प्रतीकात्मक विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यातून हजारो भाविक उपस्थित राहिले होते.
दरम्यान तिरुपती श्री बालाजी देवस्थानचे ऐतिहासिक सातारानगरी बरोबर खूप वर्षापासूनचे संबध आहेत. सातारचे मराठा जनरल राघोजी भोसले यांनी श्री बालाजीच्या चरणी मूल्यवान वस्तू अर्पण केल्या होत्या. त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी 99 वा प्रतीकात्मक विवाह सोहळा साताऱ्यात घेण्यात आला होता. श्री बालाजी यांचा 100 वा प्रतीकात्मक विवाह सोहळा लवकरच कोल्हापूर येथे होणार आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: