पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांना राष्ट्रपती पदक जाहीर
ऐक्य समूह
Thursday, January 26, 2012 AT 02:25 AM (IST)
फलटण, दि. 25 : डेक्कन पोलीस ठाणे, पुणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोहर शंकर जोशी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून उद्या, दि. 26 जानेवारी रोजी पुणे येथे ध्वजवंदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मनोहर जोशी यांच्यावर संपूर्ण पोलीस दलामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सन 1984 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या मनोहर जोशी यांनी यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण करुन 1985 मध्ये जोगेश्वरी पोलीस ठाणे (मुंबई) येथे कामकाजास सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत भोसरी (पुणे), पिंपरी, खडकी, नागपूर, सोनेगाव, सातारा, पाटण, कराड शहर, फलटण, डी. एस. बी. सातारा, पुणे शहर येथे उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सध्या ते पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम करताना दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या असे अनेक गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात ते यशस्वी झाले आहेत. पोलीस दलात काम करतानाही त्यांनी सर्वसामान्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. गुन्ह्याचा तपास करताना या लोकसंग्रहाचा फायदा होतो.
अत्यंत धाडसाने आणि निष्ठेने काम करण्याच्या पध्दतीमुळे गेल्या 34 वर्षांच्या सेवाकालात त्यांना 305 बक्षिसे मिळाली आहेत.
भोसरी येथील दंगल परिस्थिती उत्कृष्टरितीने हाताळल्याबद्दल तत्कालीन पोलीस उपायुक्त अशोक धिवरे यांनी 1000 रुपयांचे बक्षीस देवून जोशी यांना सन्मानित केले होते. त्याचप्रमाणे खडकी बाझार येथील दंगल रोखण्यात यश आल्याने पुणे शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्तांनी 200 रुपये व सी नोट देवून जोशी यांना सन्मानित केले. नागपूर येथे कार्यरत असताना समाजकंटकांनी मूर्ती विटंबना केली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीही त्यांनी उत्कृष्टरित्या हाताळली.
सातारा जिल्ह्यात 2002 साली नेमणुकीस असताना संपूर्ण महाराष्ट्रात कुप्रसिध्द झालेले सातारा शहरातील सेक्स स्कॅंडल, पाटण, कराड, फलटण येथे कार्यरत असताना विविध गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद केले. सातारा येथे कार्यरत असताना एका मटकाकिंगच्या घरावर छापा टाकून 2 कोटी 1 लाख 84 हजार रुपये जप्त केल्याबद्दल तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. आर. आर. पाटील यांच्या हस्ते पोलीस पथकाला 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले होते.
उत्कृष्ट कामगिरीमुळे जोशी यांना 2008 साली पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. सर्वसामान्य जनतेप्रमाणे अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही त्यांचे संबंध सलोख्याचे असल्याने त्यांच्या कामात सर्वांचेच सहकार्य लाभते. राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांनी जोशी यांचे अभिनंदन करुन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.