Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ठाकूरकी येथे स्पिनिंग मिलला भीषण आग; एक कोटीचे नुकसान
ऐक्य समूह
Thursday, January 26, 2012 AT 02:19 AM (IST)
Tags: news
फलटण, दि. 25 : ठाकूरकी, ता. फलटण येथील सूतगिरणीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक लागलेल्या आगीत मशिनरी, कापूस व साहित्याचे सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत घटनास्थळ आणि पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,  फलटण-सातारा रस्त्यावर फलटणपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर ठाकूरकी येथील एस. एम. सूतगिरणी प्रा. लि.,च्या मशिनरीमध्ये आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन धुराचे लोट आणि त्यापाठोपाठ आगीच्या प्रचंड ज्वाळा बाहेर पडू लागल्या. आगीने उग्र रुप धारण केले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या व त्यांचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील होते. आगीचे उग्र रुप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. मिलमधील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाल्याचे दिसून आले. या घटनेची फिर्याद मिलचे मॅनेजिंग डायरेक्टर अन्वर सत्तार नदाफ यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळास तत्काळ भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. सुमारे 1 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे करत आहेत.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: