
"पालकांची जोखीम व पाल्यांची स्वप्नपूर्ती' साधणारी अनोखी योजना
सातारा, दि. 25 : लहान मुलांचे भवितव्य घडवणारी; परंतु पालकांचा विमा असलेली "जीवन अंकुर' ही अनोखी योजना एलआयसीने संपूर्ण भारतभर ग्राहकांसाठी खुली केली आहे. एलआयसीच्या सातारा शाखा क्रमांक 1 (941) मध्ये या योजनेचा शुभारंभ दैनिक ऐक्यचे संपादक देवेंद्र पळणिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील विमाधारक व विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही योजना विक्रीसाठी खुली करण्यात आली. देवेंद्र पळणिटकर यांनी एलआयसीच्या कार्याचा गौरव करुन संस्थेने सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाची भर टाकण्याचे आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यात सहकार्य केल्याचे उद्गार काढले.
नवीन योजनेबद्दल ते म्हणाले, पालक आपल्या मुलांसाठी सर्वस्व देऊन स्वप्ने पहात असतात. अशावेळी ही योजना एक आधारस्तंभ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरेल. या योजनेमुळे बचतीची सवय लागेल. या योजनेद्वारे मुलांनाही बचतीचा संदेश मिळेल. एलआयसीच्या सर्वच योजना अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत. या योजनेद्वारेही संस्था भरघोस आर्थिक कामगिरी करेल.
सातारा शाखेचे मुख्य व्यवस्थापक शिरीष शहा यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, सन 2000 नंतर निर्माण झालेल्या स्पर्धेच्या वातावरणात संस्थेने आपल्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. त्याचा परिणाम म्हणून 23 विमा कंपन्यांमध्ये एलआयसीचा बाजारातील वाटा 79 टक्क्यांवर गेला आहे. या स्पर्धेतही संस्था आघाडीवर आहे. संस्थेचे 23 कोटी विमाधारक असून "क्लेम सेटलमेंट'मध्ये जगातील सर्व विमा कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेली एलआयसी ही एकमेव कंपनी आहे.
देशाच्या पंचवार्षिक योजनांमध्ये कंपनीने आतापर्यंत सिंहाचा वाटा उचलला आहे. 2006-11 या योजनेत आतापर्यंत 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीचे सर्व कामकाज संगणकीकृत करुन अत्याधुनिक तांत्रिक बाबींचा आतापासून वापर करण्यास सुरुवात केली आहे.
जीवन अंकुर ही खरोखरच नवीन व कल्पक योजना आहे. नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य असलेल्या या योजनेमुळे मुलांच्या भवितव्याची जडणघडण निर्विघ्नपणे होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाखा प्रबंधक सुशांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जीवन अंकुर या योजनेची विस्तृत माहिती त्यांनी दिली. विमेदारास अधिक फायदे देणारी व त्याच्या मृत्यूनंतरही पाल्याची जबाबदारी कंपनी कशा प्रकारे स्वीकारणार, हे त्यांनी उदाहरणाद्वारे समजावून सांंगितले. शाखेतील आघाडीचे सीडीटी/एडीआरटी झालेले एजंट सुनील शहा यांनी जीवन अंकुर पॉलिसीचा पहिला आणलेला धनादेश प्रमुख पाहुणे देवेंद्र पळणिटकर यांनी स्वीकारुन तो एलआयसीचे शाखा प्रबंधक देशपांडे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी एलआयसीचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी, विमाधारक व मान्यवर उपस्थित होते.