Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाचक, लेखक आणि प्रकाशक असेपर्यंत मराठीचे भविष्य उज्ज्वल : डहाके
ऐक्य समूह
Tuesday, January 10, 2012 AT 01:19 AM (IST)
Tags: news

सातारा, दि. 9 : प्रत्येक गावात ज्याप्रमाणे देऊळ व पाणवठा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक गावात एक ग्रंथालय असायलाच हवे. ग्रंथालय चळवळ वाढविण्यासंदर्भात शासनाचे प्रयत्न केवळ घोषणाबाजीत अडकले आहेत. वाचन संस्कृती वाढत नाही, अशी तक्रार करण्यापेक्षा प्रत्येक मुलाच्या हातात ग्रंथ कसा पडेल, यासाठी शासनाबरोबरच समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. जोपर्यंत समाजात वाचक, लेखक व ते प्रकाशित करणारे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत मराठीचे भविष्य धोक्यात आहे असे वाटत नाही, असे प्रतिपादन चंद्रपूर येथील 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले.
तालीम संघाच्या मैदानावर कुसुमाग्रज-नगरी येथे सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 व्या ग्रंथमहोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी डहाके बोलत होते. पाठ्यपुस्तक महामंडळातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. माधव राजगुरू अध्यक्षस्थानी होते. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मकरंद गोंधळी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर, समितीचे उपाध्यक्ष वि. ना. लांडगे, कार्यवाह शिरीष चिटणीस, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डॉ. राजेंद्र माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
वसंत डहाके म्हणाले, ग्रंथ नसते तर माणसाची अवस्था प्राण्यांसारखी झाली असती. ग्रंथ हे विचार व भावनेवर संस्कार करतात. प्रौढ तसेच नवी पिढी वाचत नाही, असे बोलले जाते  परंतु हा समज खोटा आहे. ई-बुक आल्यामुळे अलीकडे अनेक प्रकाशकांना भविष्यात ग्रंथ छापले जाणार का, असा प्रश्न पडला आहे. मात्र, ई-बुक ही सोय आहे, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ई बुकमुळे कोणत्याही ठिकाणी पुस्तक वाचता येते. ग्रंथ हे चिरकाल टिकणारे असतात. त्यांच्याशी भावना निगडित असतात. आठवणी जोडलेल्या असतात. आजही अनेकांकडे जुनी, भेट दिलेली अनेक पुस्तके असतात. ती पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात. ग्रंथ सोबत करतात, शिकवतात. मुलांसाठी उत्तमोत्तम ग्रंथ यावेत यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आज मोठ्या शहरातील काही अपवाद सोडले तर छोट्या शहरातील आणि गावांमधील ग्रंथालयांची अवस्था अगदीच बिकट आहे. शाळा, महाविद्यालयातील ग्रंथालये बरी आहेत. मात्र, अनेक गावात ग्रंथालयेच नाहीत. जिल्हास्तरावर ग्रंथमहोत्सव सुरू करून शासनाने चांगले पाऊल उचलले आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊन गावातल्या मुलांच्या हातात पुस्तके पडण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही. मुलांनी वाचले पाहिजे, तरच समृद्ध पिढी घडेल. नवीन पिढीच्या हातात पुस्तके पडण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत. गावात ग्रंथालय सुरू झाले तर सर्वच छोटे मोठे लोक पुस्तके वाचतील. यातून एक आदर्श समाज उभा राहील, असे डहाके म्हणाले. यावेळी बोलताना डॉ. राजगुरू म्हणाले, पुस्तकेच नव्हे तर आजूबाजूची सर्व परिस्थिती आपल्याला वाचता आली पाहिजे. मात्र, ही परिस्थिती वाचण्यास पुस्तकेच शिकवितात, हे ही समजणे गरजेचे आहे. अनेकवेळा आपल्याला अवतीभवतीचे जग नको असते, त्यावेळी पुस्तके आपली सोबत करतात. आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो. महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर नवोदित साहित्यिकांच्या पुस्तक तसेच सीडींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिरीष चिटणीस यांनी स्वागत केले व परिचय करून दिला. डॉ. यशवंत पाटणे यांनी ग्रंथोत्सवामागची भूमिका स्पष्ट केली. मकरंद गोंधळी यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमी उपस्थित होते.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: