Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजे समाजाचे प्रतिबिंब : गोडबोले
ऐक्य समूह
Saturday, September 03, 2011 AT 01:13 AM (IST)
Tags: news


सातारा, दि. 2 : वृत्तपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात सामाजिक घटना आणि घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असल्याने, प्रशासन आणि लोकही आवर्जून ही पत्रे वाचतात. त्याचा योग्य परिणामही संबंधितांवर घडतो, असे मत ज्येष्ठ करसल्लागार अरूण गोडबोले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पी. डी. कुलकर्णी यांच्या "विचारसुमने' या वाचकांच्या पत्रव्यवहारातील निवडक पत्रांच्या संग्रहाचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कुलकर्णी यांच्या पत्रसंग्रहाच्या पुस्तकाची प्रशंसा करून ते म्हणाले, अशा प्रकारचे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असेल. कोणताही व्यक्तिगत लाभ वाचकांचा पत्रव्यवहार सदरात पत्र लिहिणाऱ्या पत्रलेखकांचा नसतो. सामाजिक बांधिलकी आणि जाणिवांमुळेच हे लोक पत्रे लिहितात. समाजातील विविध घडामोडींचा आणि समस्यांचा वेध घेतात. लोकहितासाठी त्यांची सारी ही धडपड असते. कुलकर्णी यांनी निवृत्तीनंतर जोपासलेला हा छंद सामाजिक हिताचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दै. ऐक्यमुळेच आपण पत्र लेखक झाल्याचे कृतज्ञतापूर्वक सांगून या ग्रंथाचे लेखक पी. डी. कुलकर्णी म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर सामाजिक जाणिवेने पत्रलेखन करत राहिलो. वाचकांचाही आपल्या पत्रांना चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनीही आपल्या पत्रांना स्थान दिले. या छंदाचे रूपांतर नियमित पत्रलेखनात झाले. आपण वाचकही आहोत आणि जनतेचे प्रतिनिधीही आहोत याची जाणीव पत्रलेखकांना असते, असेही ते म्हणाले.
डॉ. सौ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांचेही याप्रसंगी भाषण झाले. या समारंभाला वाचकांची आवर्जून उपस्थिती होती.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: