Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोबाईलच्या आदेशावर आता वीजपंप सुरू-बंद होणार
ऐक्य समूह
Sunday, August 14, 2011 AT 12:46 AM (IST)
Tags: news


भुईंज, दि.13 : वीज गेली... वीजपंप (मोटर) बंद पडला... शेतात जा आणि पुन्हा मोटर सुरु करा... या सर्व मन:स्तापापासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोबाईल स्टार्टर नावाचे सॉफ्टवेअर बाजारात आल्यामुळे आता शेतकऱ्यांना घरबसल्या अथवा जगात जिथे असाल तेथून मोबाईलच्या एका बटनाद्वारे शेतीपंपाची मोटर सुरु अथवा बंद करता येणार आहे. किसनवीर साखर कारखान्याना कार्यस्थळावर प्रात्यक्षिकासह हे युनिट प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले असून कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना मागणीनुसार वाजवी दरात हे उपकरण उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
पाण्याशिवाय शेती नाही. हे पाणी शिवारात खेळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या विहिरी अथवा नदीवरील मोटर सुरु-बंद करण्यासाठी चकरा माराव्या लागतात. बेभरवशाच्या विजेमुळे शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. हा मन:स्ताप कमी होऊन शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, मनुष्यबळ, वीज, पाणी, इंधनामध्ये बचत होण्यासाठी पुणे येथील ख्याती डिजिटल मोटर मॅनेजमेंट या आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त कंपनीने "ख्याती मोबाईल स्टार्टर' ही मायक्रोकंट्रोलर व सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. यामध्ये नोकिया 1280 सिरिजचा मोबाईल, मोबाईल बॅटरी चार्जर, 3 ते 30 सेकंदाचा स्टार डेल्टा टाइमर आदी उपकरणे या मोबाईल स्टार्टरमध्ये असून सिंगल अथवा थ्री फेजवर 500 एचपीपर्यंतची शेतीपंप मोटर घरबसल्या अथवा देशात कुठूनही मोबाईलद्वारे सुरु अथवा बंद करता येते. हे युनिट नियंत्रित करण्यासाठी चार अंकी पासवर्ड देण्यात आला असून मोटर सुरु आहे की बंद आहे, वीज आहे किंवा नाही, मोटर अन्य कारणांमुळे बंद आहे कृपया तपासणी करावी, अशा सूचना देण्याबरोबरच आपल्याला हवी त्यावेळी आपल्याकडे असणाऱ्या मोबाईलवरून मोटर सुरु-बंद करता येते.
पासवर्डमुळे सुरक्षितता, वीज जाऊन परत आल्यावर मोटर ऍटोमेटिक सुरू होते. ऍटो कॉल डिस्कनेक्ट सुविधा असल्यामुळे कॉल चार्जेसमध्ये बचत होते. सॉफ्टवेअर असल्या-मुळे याला बॅटरीची गरज नाही. अशा बहुविध फायद्यांमुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होऊन शेती उत्पादनातही वाढ होते. वेगवेगळ्या मॉडेल्स-मध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध असून कारखान्याने पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ हे मोबाईल स्टार्टर युनिट प्रायोगिक तत्वावर बसविले आहे. दरम्यान, कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना ही सुविधा वाजवी दरात उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांशी कारखाना व्यवस्थापन चर्चा करीत आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: