Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घरचा आहेर
ऐक्य समूह
Monday, February 14, 2011 AT 01:13 AM (IST)
Tags: news

 नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) ः दिल्लीपासून गल्लीपर्यंतची भ्रष्टाचारी कॉंग्रेस सरकारे देशाला चुना लावत आहेत, असा सल्ला देणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काल गोपूजनाबाबत गाय ही देवता नव्हे पशू असे ठणकावणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण करुन देणारे परखड वक्तव्य केले व संघ परिवाराला जणू घरचा आहेर दिला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि पत्रकारिता या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, हा नव्या पिढीचा जमाना आहे. चिंतन नव्या संदर्भात मांडले पाहिजे. मला कोणी सांगितले, की गाईला नमस्कार करा. त्यात 33 कोटी देवता आहेत तर मी म्हणेन दाखवा कोठे आहेत त्या देवता? गडकरी यांनी हे वाक्य उच्चारता क्षणी गाय ही देवता नव्हे तर उपयुक्त पशू आहे, असे सांगणाऱ्या सावरकरांची आठवण उपस्थितांच्या मनात जागली.
गोरक्षणाबाबत संघ परिवाराची घोषणा सर्वश्रुत आहे. गडकरी यांनी गाईबाबतचे हे क्रांतिकारक मत मांडण्यापूर्वी काही मिनिटे आधीच या पुस्तकाचे लेखक महेश शर्मा यांनी एक आठवण सांगितली. त्यानुसार ऑर्गनायझरमध्ये एकदा संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण लोकशाहीच्या बैलाला कापत आहे, असे व्यंगचित्र छापून येताच स्वतः पंडित उपाध्याय यांनी ऑर्गनायझरच्या संपादकांचे कान उपटले होते. कितीही विरोध असला तरी एक हिंदू व्यक्ती गोवंशाची हत्या करीत आहे, असे आक्षेपार्ह चित्र तुम्ही कसे छापलेेत, अशा शब्दात त्यांनी ऑर्गनायझरच्या तत्कालिन संपादकांची झाडाझडती घेतली होती, अशी शर्मा यांनी आठवण सांगितली. त्यानंतर काही वेळानंतर भाजप अध्यक्षांनी गाईबद्दल मत मांडून खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण जागवल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती.
संसदीय लोकशाहीतील सर्वात ज्येष्ठ नेते (लालकृष्ण अडवाणी) आमच्याकडे आहेत. असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपच्या चाणक्यांनाही त्यांच्या पक्षाध्यक्षांनी ओल्ड इज गोल्ड हे सत्य नाही, असे परखडपणे सांगून याच कार्यक्रमात आणखी एक धक्का दिला. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईशान्य राज्यातील भ्रष्टाचारावर तयार केलेल्या अहवालाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते आज भाजप मुख्यालयात झाले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर सडकून टीकास्त्र सोडले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: