Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मदन पवार यांचे पुस्तक मार्गदर्शक : कामत
ऐक्य समूह
Tuesday, October 26, 2010 AT 01:14 AM (IST)
Tags: news

मान्यवरांच्या उपस्थितीत "हॉटेलनामा'चे प्रकाशन
सातारा, दि. 25 ः नियम, नियोजन, नियंत्रण यातून केलेल्या निर्मितीला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. मदन पवार यांचे पुस्तक हॉटेल  व्यावसायिकांसाठी व हॉटेल व्यवसायात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी  मार्गदर्शक ठरेल. सातारचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. मदन पवार यांच्या पुढील पुस्तकाचेही प्रकाशन याच ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा एम. डी. कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स प्रा. लि. चे चेअरमन विठ्ठल कामत यांनी व्यक्त केली.
सातारा सैनिक स्कूलमध्ये मदन पवार यांच्या "हॉटेलनामा' या पुस्तकाचे प्रकाशन कामत यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार व किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, जिल्हाधिकारी संभाजीराव कडू-पाटील, दै. ऐक्यचे संपादक देवेंद्र पळणिटकर, साहेबराव पवार, सातारा सैनिक स्कूलचे मुख्याध्यापक विंग कमांडर रवींद्र सिंग, भगत पाटील, अनिल कांबळे, विलास टोकले उपस्थित होते.
विठ्ठल कामत पुढे म्हणाले, सातारच्या संस्कृतीचे वैभव जगप्रसिद्ध आहे.  मदन पवार यांनी सातारी चिकन, सातारी मटण आणि सातारी रस्सा अशी नावे आपल्या हॉटेलमधील पदार्थांना देऊन सातारचे ब्रॅंडनेम तयार केले. सातारचा कंदी पेढाही जगात बॅं्रडनेम बनला आहे. साताऱ्यातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनीही उत्कृष्ट निर्मिती करुन सातारचे ब्रॅंडनेम तयार करावे. त्यातून सातारची प्रगती व उन्नती होईल, असा मला विश्वास आहे.
मदन पवार यांनी हॉटेल व्यवसायातील अनुभव या पुस्तकात शब्दबध्द केले आहेत. हे पुस्तक सर्वांसाठी उपयुक्त आहे. हॉटेल व्यवसायात येणाऱ्या अडचणी, जागा, मेनू, ग्राहकांची आवड याविषयीची माहिती या पुस्तकात आहे. हॉटेल व्यवसायात येणाऱ्या काही कटू प्रसंगांची माहितीही या पुस्तकात आहे.
साताऱ्याचा नावलौकिक झाला तर तो पर्यटकांसाठी उपयुक्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
संभाजीराव कडू-पाटील म्हणाले, मदन पवार यांची आणि माझी गेल्या दहा वर्षांची ओळख आहे. मात्र लेखक म्हणून त्यांची नव्याने ओळख आज झाली. त्यांनी आपले अनुभव प्रांजळपणे या पुस्तकात मांडले आहेत. त्यांनी या पुस्तकात चांगल्या कल्पना मांडल्या आहेत. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना हे पुस्तक उद्‌बोधक ठरेल.
मदन भोसले म्हणाले, या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने विठ्ठल कामत व अनेक मान्यवर येथे आले, हीच मदन पवार यांच्या यशाची पोचपावती आहे. हॉटेल व्यवसायातील अडचणी या पुस्तकात मांडल्याने हे पुस्तक उपयुक्त आहे.
कॉ. किरण माने यांनी प्रास्ताविक केले. सुधीर पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: